
चेक बाऊन्स प्रकरणी आश्वासन देऊनही त्याची पूर्तता न केल्याने सर्वोच्च न्यायालयाने आज अभिनेता राजपाल यादव याला फटकारले. तुमचा अभिनय इथे चालणार नाही, या अहंकाराला जागा दाखवण्याची गरज असून तुमची जागा तुरुंगातच असल्याचे खडे बोल कोर्टाने राजपालला सुनावले.
चेक बाऊन्स प्रकरणी 8 सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम दिलासा देत 5 कोटी कोर्ट रजिस्ट्रीमध्ये भरण्याचे आदेश दिले होते. 15 सप्टेंबरला त्यांनी मालमत्ता विपून पैसे भरणार असल्याचे आश्वासन दिले होते. कोर्टाने 5 ऑक्टोबरपर्यंत दिलेली मुदत आज संपली. मात्र राजपालने 50 लाखांच्या डिमांड ड्राफ्टची प्रत न्यायालयात सादर केली. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने संताप व्यक्त केला. सरन्यायाधीश सूर्य कांत, न्यायमूर्ती जॉयमाला बागची व न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पूर्णपीठासमोर झालेल्या सूनावणीवेळी राजपाल यादवच्या वकिलाला न्यायालयाने सुनावले.


























































