Jammu Kashmir – अर्निया सेक्टरमध्ये पिस्तूल आणि अमली पदार्थांसह दोन जणांना अटक; पाकिस्तानी टोळीच्या संपर्कात असल्याची माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाकिस्तानी टोळीच्या संपर्कातील जम्मू-काश्मीरच्या अर्निया सेक्टरमधून दोन जणांना पिस्तूल आणि अमली पदार्थांसह अटक करण्यात आली आहे. आरोपींनी पाकिस्तानमधून ड्रोनद्वारे टाकलेली शस्त्रे आणि अमली पदार्थ गोळा करून ते जम्मू-कश्मीर व पंजाबमधील आपल्या संपर्कातील व्यक्तींना पुरवल्याचा आरोप आहे.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, रोहित कुमार आणि अजय अशी अटक केलेल्या दोघांची नावे असून, ते अर्नियामधील त्रेवा येथील रहिवासी आहेत. हे दोघे पाकिस्तानस्थित गँगस्टर आणि खलिस्तानी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या शहजाद भट्टीच्या संपर्कात होते. तसेच त्यांनी आंतरराष्ट्रीय सीमेजवळ ड्रोनद्वारे टाकलेल्या दोन कंसाईनमेंट स्वीकारले होते, असे पोलिसांनी सांगितले.

तपासादरम्यान इटली बनावटीचे एक बेरेटा पिस्तूल, दोन मॅगझिन्स, चार जिवंत काडतुसे, तसेच 500 ग्रॅम हेरॉईन आणि 500 ग्रॅम अफू जप्त करण्यात आली, असे पोलिसांनी सांगितले. रोहित कुमारला अटक केल्यानंतर चौकशीदरम्यान त्याने अजयचे नाव सांगितले. यानंतर या रॅकेटचा पर्दाफाश झाला.