
राज्य पोलीस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा त्यांच्या साहसी कामगिरीबद्दल ‘मुख्यमंत्री शौर्य पदक’ देऊन गौरव करण्यात येणार आहे. पोलिसांचे मनोबल वाढविण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आला.
महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री शौर्य पदकांची घोषणा करण्यात येईल. दरवर्षी शौर्य पदकांची निश्चित अशी संख्या राहणार नाही, तर राज्यभरातील क्षेत्रीय स्तरावरील कामगिरींबाबतचे अहवाल आणि येणाऱ्या प्रस्तावांच्या अधीन राहून पदक जाहीर केली जातील. मुख्यमंत्री शौर्य पदक मरणोत्तरही देण्याची तरतूद करण्यात आली आहे.
कर्तव्य बजावताना जोखीम पत्करून केलेल्या कामगिरीसाठी मुख्यमंत्री शौर्य पदक विजेत्यांना रोख 50 हजार रुपये, पदक तसेच प्रशस्तीपत्र मिळणार आहे.
या पुरस्कार निवडीसाठी पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती असेल. या समितीकडे आलेले प्रस्ताव गृहमंत्री तथा मुख्यमंत्री यांच्याकडे सादर केले जातील.



























































