आदिवासी विद्यार्थ्यांची मुस्कटदाबी सुरूच, सलग दुसऱ्या दिवशी धरपकड; बसमध्ये कोंबून नाशिककडे रवाना केले!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आदिवासी आश्रमशाळातील गैरसोयींच्या विरोधात नाशिक ते मुंबई असा लाँगमार्च काढून मुंबईत पोहोचलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांची पोलिसांकडून मुस्कटदाबी सुरूच आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी पोलिसांनी काँग्रेसच्या दादर येथील टिळक भवन कार्यालयात घुसून विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले. या विद्यार्थ्यांना बळजबरीने बसेसमध्ये बसवून नाशिक व जळगावला रवाना केले. पोलिसांच्या या कारवाईमुळे आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

गेल्या 48 दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाकडे सरकारने दुर्लक्ष केल्याने आझाद मैदानावर आंदोलन करण्याची घोषणा आदिवासी विद्यार्थ्यांनी केली होती. त्यासाठी रविवारी रात्री हे विद्यार्थी नाशिकमधून मुंबईत दाखल झाले. यातील काही विद्यार्थी टिळक भवनमध्ये थांबले होते. मात्र आंदोलन करण्याआधीच पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई सुरू केली. रविवारी मध्यरात्री अनेक विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले. त्यांना अनेक पोलीस ठाण्यांमध्ये फिरवण्यात आले. त्यांचा छळ करण्यात आला.

पोलिसांच्या कारवाईनंतरही आज पुन्हा अनेक विद्यार्थी टिळक भवन येथे पोहोचले. आम्हाला आंदोलन करू द्या किंवा राज्यपालांना भेटू द्या, अशी त्यांची मागणी होती; मात्र आज पुन्हा पोलिसांनी कारवाई केली. टिळक भवनात जमलेल्या सर्व विद्यार्थ्यांना बळजबरीने उचलून बसेसमध्ये कोंबण्यात आले व या बस नाशिक, जळगावच्या दिशेने रवाना करण्यात आल्या.

काँग्रेसचा तीव्र संताप

पोलिसांच्या कारवाईवर काँग्रेस नेत्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. ‘टिळक भवनात प्रवेश करून दडपशाही का केली? बेकायदेशीरपणे पक्ष कार्यालयात शिरलात का व कशासाठी, असा जाब नेत्यांनी पोलिसांना विचारला. भाजप सरकार पोलिसांना पुढे करून गुंडगिरी करत आहे, ती आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा काँग्रेसने दिला.

विद्यार्थ्यांच्या मागण्या

  • आदिवासी आश्रमशाळेतील 600 विद्यार्थ्यांच्या मृत्यूची निष्पक्ष चौकशी करा.
  • आदिवासी विकास मंत्र्यांचा राजीनामा घ्या.
  • आदिवासी आयुक्तांची बदली करा.
  • आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना मुलभूत सुविधा उपलब्ध करून द्या.
  • सेंट्रल किचनमधून येणाऱ्या जेवणाचा दर्जा सुधारा .