गायक पलाश मुच्छल सांगली उपविभागीय कार्यालयात हजर, अधिकाऱ्यांकडून चौकशी; आरोप फेटाळले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फसवणूक आणि जातीवाचक शिवीगाळ प्रकरणातील गुह्यात मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने दिलेल्या आदेशानुसार जमिनीची कागदपत्रे जमा करण्यासाठी संगीत दिग्दर्शक, गायक पलाश मुच्छल आज सांगली शहर उपविभागीय कार्यालयात हजर झाला होता. यावेळी त्याची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी केली. मात्र, चौकशीदरम्यान त्याने सर्व आरोप फेटाळल्याचे समजते.

गायक पलाश मुच्छल हा लग्न सोहळ्यापूर्वी चित्रपट निर्मितीच्या निमित्ताने सांगलीत आला होता. तेव्हा फिर्यादी विज्ञान माने याच्याशी ओळख झाली होती. तेव्हा पलाश याने ‘नजरिया’ चित्रपटात गुंतवणुकीसाठी विज्ञान माने यांच्याकडून 25 लाख रुपये घेतले होते. चित्रपट पूर्ण न केल्यामुळे पलाश याने फसवणूक केल्याचा आरोप माने यांनी केला. तसेच पैशांची मागणी केल्यानंतर 22 नोव्हेंबर 2025 रोजी सांगली-आष्टा रोडवरील टोलनाक्यावर वाद झाला होता. त्यावेळी पलाश याने जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी माने यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात ऍट्रॉसिटी आणि धमकीचा गुन्हा दाखल केला आहे. अटकेच्या भीतीने पलाश याने अटकपूर्व जामिनासाठी सांगलीतील जिल्हा न्यायालयात धाव घेतली. त्याला अंतरिम जामीन मिळाला होता. मात्र, त्याने अटींचे पालन केले नाही. त्यामुळे त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. यानंतर पलाश याने कोल्हापूर सर्किट बेंच येथे जामिनासाठी धाव घेतली होती. कोल्हापूर बेंचने त्याचा जमीन मंजूर केल्यानंतर आज तो सांगलीमध्ये कागदपत्रे जमा करण्यासाठी उपविभागीय कार्यालयात दाखल झाला होता.