अडकलेल्या ट्रॅफिककोंडीत महिलेची रिक्षातच प्रसूती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वाहतूककोंडीचा प्रश्न किती गंभीर बनला आहे याचा धक्कादायक प्रत्यय आज उल्हासनगरात आला. प्रसूती कळा सुरू झालेल्या गर्भवती महिलेला कुटुंबीय रिक्षातून शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात घेऊन जात असताना रिक्षा वाहतूककोंडीत अडकली. त्यामुळे रुग्णालय अवघ्या काही अंतरावर असतानाच या महिलेची रिक्षातच प्रसूती झाली आहे. सुदैवाने बाळ आणि बाळंतिणीची प्रकृती सुखरूप आहे. कॅम्प क्रमांक ३ मधील सेक्शन २० परिसरात राहणाऱ्या हरिकला थापा यांना प्रसूती कळा सुरू झाल्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना तातडीने शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यावेळी वाहन सहज उपलब्ध न झाल्याने अखेर रिक्षाने त्यांना रुग्णालयात नेण्यात येत होते. मात्र न्यु एरिया परिसरात प्रचंड वाहतूककोंडी असल्याने रिक्षा अडकून पडली. या कोंडीत तब्बल १५ ते २० मिनिटांचा वेळ गेला. दरम्यान हरिकला यांना प्रसूती वेदना अधिक तीव्र झाल्या आणि रुग्णालयापासून जवळच या महिलेची रिक्षातच प्रसूती झाली.

घटनेनंतर प्रशासनाला जाग येईल का?

अतिक्रमण, त्यात पालिका आणि पोलिसांच्या दुर्लक्षामुळे उल्हासनगरातील विविध प्रमुख रस्ते आणि चौकांमध्ये वारंवार वाहतूककोंडी होते. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. विशेषतः रुग्णवाहिका, अग्निशमन वाहने तसेच अन्य रुग्णांना यामुळे अधिक मनस्ताप होतो. त्यामुळे एखादी दुर्घटना घडल्यावरच प्रशासनाला जाग येईल का, असा सवाल नागरिकांनी विचारला आहे.