
राजकीय रंग चढला. दाखल 350 पेक्षा अधिक उमेदवारी अर्जांची छाननी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. विविध उमेदवारांच्या अर्जांवर हरकती घेण्यात आल्याने दिवसभर निवडणूक कार्यालयात कायदेशीर युक्तिवाद, राजकीय चर्चा आणि समर्थकांची गर्दी पाहायला मिळाली. माजी खासदार डॉ. सुजय विखे-पाटील, माजी आमदार राहुल जगताप, आमदार किरण लहामटे आणि आमदार मोनिका राजळे यांच्या अर्जांवरही हरकती नोंदविण्यात आल्या. त्यामुळे बुधवारी (दि. 7) जाहीर होणाऱ्या अंतिम निर्णयाकडे जिह्याचे लक्ष लागले आहे.
दहा वर्षांच्या मुद्दय़ावर दिलासा
बँकेचे माजी अध्यक्ष चंद्रशेखर घुले, सीताराम गायकर आणि अंबादास पिसाळ हे दहा वर्षांपेक्षा अधिक काळ संचालक राहिल्याने उमेदवारीवर प्रश्न होता. मात्र, छाननीमध्ये या तिघांचेही अर्ज वैध ठरले.
आज अंतिम चित्र
नेवासा, संगमनेर, शेवगाव, श्रीरामपूर, पाथर्डी, नगर तालुका, जामखेड, राहाता, राहुरी, कोपरगाव, पारनेर, अकोले, कर्जत आणि श्रीगोंदा आदी तालुक्यांतील अर्जांची छाननी व हरकतींवरील सुनावणी मंगळवारी (दि. 6) पार पडली. काही अर्ज अवैध ठरले असून, अनेक अर्जांवरील हरकतींची सुनावणी उशिरापर्यंत सुरू होती. आता उद्या (दि. 7) सकाळी 11 वाजता हरकतींचे निकाल जाहीर करण्यात येणार आहेत. त्यानंतर जिल्हा बँकेच्या निवडणूक रिंगणात प्रत्यक्षात किती उमेदवार राहिले, किती अर्ज बाद झाले, याचे चित्र स्पष्ट होणार आहे.
काही अर्ज बाद; अंतिम चित्र आज स्पष्ट होणार
छाननीदरम्यान काही उमेदवारांच्या अर्जांसोबत आवश्यक कागदपत्रांची पूर्तता नसल्याचे निदर्शनास आले. लेखापरीक्षण अहवाल, आधार कार्ड तसेच इतर आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी संबंधितांना दुपारी तीन वाजेपर्यंत मुदत देण्यात आली. त्यानंतर विविध हरकतींवर सुनावणी घेण्यात आली. अनेक अर्जांवर कायदेशीर मुद्दे उपस्थित करण्यात आल्याने ही प्रक्रिया सायंकाळपर्यंत सुरू होती.
संगमनेर सोसायटी मतदारसंघातील अर्जाने राजकीय चर्चेला वेगळे वळण दिले. रणजितसिंह विजयसिंह देशमुख यांच्या विरोधात चित्रा गायकवाड यांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जातील सुचकाने आपली सही बनावट असल्याचा दावा केल्याची माहिती समोर आली. संबंधित सुचकाचा
इन-कॅमेरा जबाब नोंदविण्यात आल्याचे सांगण्यात आले. याच धर्तीवर राहाता सोसायटी मतदारसंघात डॉ. सुजय विखे-पाटील यांच्या विरोधात उमेदवारी दाखल करणारे चंद्रभान घोगरे यांच्या अर्जाबाबतही सुचकाने आपली सही नसल्याचा जबाब दिल्याचे सांगण्यात आले.
गडाख-घुले यांचा गड कायम
नेवासा तालुक्यात माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या विरोधात एकही अर्ज दाखल झाला नाही. त्यामुळे नेवासा मतदारसंघात गडाख यांचा प्रभाव कायम असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे, शेवगावमध्ये माजी मंत्री चंद्रशेखर घुले यांच्या विरोधातही एकही अर्ज नसल्याचे समोर आले आहे. चंद्रशेखर घुले आणि राजश्री घुले या दोघांचे अर्ज मंजूर झाले असून, राजश्री घुले यांचा अर्ज मागे घेतला गेल्यास चंद्रशेखर घुले यांची बिनविरोध निवड होण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.
थकबाकीची हरकत फेटाळली
डॉ. सुजय विखे-पाटील यांच्या उमेदवारी अर्जावर राहुरी कारखान्याच्या जिल्हा बँकेकडील थकबाकीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. ऍड. सुरेश लगड यांनी ही हरकत नोंदविली. मात्र, दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर ही हरकत फेटाळण्यात आली.
राळेभात कुटुंबासमोर घुमरेंचे आव्हान
जामखेडमधील जगन्नाथ राळेभात यांचे पुत्र अमोल आणि सुधीर राळेभात यांनी अर्ज दाखल केले आहेत. दुसरीकडे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या समर्थकांकडून सचिन घुमरे यांचा अर्ज दाखल करण्यात आला आहे. या तिन्ही उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.
कोपरगावात काळे-कोल्हे समीकरणाची चर्चा
कोपरगावात शेतीपूरक मतदारसंघातून आशुतोष काळे, तर सोसायटी मतदारसंघातून विवेक कोल्हे यांनी उमेदवारी दाखल केली आहे. दोन्ही नेत्यांनी थोरात-विखे समर्थक पॅनलमधून निवडणूक लढविण्याचे जाहीर केल्याने कोपरगावातील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाले आहे.
श्रीगोंद्यात नाहाटा, पाचपुते यांचे अर्ज बाद
श्रीगोंदा सोसायटी मतदारसंघात सभापती बाळासाहेब नाहाटा यांच्या अर्जासोबत सोसायटीची कागदपत्रे पूर्ण नसल्याचे आढळले. मात्र, सोसायटी ‘क’ वर्गातील असल्याने नाहाटा यांचा अर्ज बाद झाला. बबनराव पाचपुते यांनी ज्या सोसायटीचा ठराव घेऊन उमेदवारी दाखल केली ती सोसायटीही ‘क’ वर्गातील असल्याने त्यांचा अर्जदेखील बाद झाला.

































































