
वृंदावन येथील एका निवासी गुरुकुलात अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना घडली आहे. दुर्गंधी येत असल्याच्या तक्रारीनंतर १२ फूट खोल भूमिगत पाण्याची टाकी स्वच्छ करण्यासाठी उतरलेल्या पाच विद्यार्थ्यांपैकी चार जणांचा गुदमरून मृत्यू झाला, तर एका विद्यार्थ्याला वाचवण्यात यश आले असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
#WATCH | Vrindavan, UP: Four students died after allegedly being overcome by toxic gas while cleaning a water tank. https://t.co/a03YbS32aa
— ANI (@ANI) October 6, 2026
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाण्याच्या टाकीतून दुर्गंधी येत असल्याने स्वच्छतेसाठी सुरुवातीला एक विद्यार्थी खाली उतरला होता. मात्र, बराच वेळ तो बाहेर न आल्याने आणि आतून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्याला वाचवण्यासाठी इतर चार विद्यार्थीही एकापाठोपाठ एक टाकीत उतरले. टाकीत तयार झालेल्या विषारी वायूच्या विळख्यात सर्वजण अडकल्याने हा भीषण अपघात घडला. मृत विद्यार्थ्यांचे वय १७ ते २० वर्षांच्या दरम्यान असल्याचे सांगण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले. टाकीतून पाचही जणांना बाहेर काढण्यात आले, परंतु त्यातील चार जणांचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला होता. टाकीत साचलेल्या विषारी वायूमुळे (Toxic Gas) ऑक्सिजनची कमतरता निर्माण होऊन त्यांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी सखोल चौकशी सुरू केली असून गुरुकुल परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासले जात आहे. या निष्काळजीपणाला कोण जबाबदार आहे याचा शोध घेतला जात आहे. उत्तर प्रदेश सरकारने या घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला असून पीडित कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.


























































