साताऱ्यात 12 जणांचे अर्ज बाद; 162 जण रिंगणात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या 21 जागांच्या निवडणुकीत उमेदवारी अर्जांच्या छाननीत 12 जणांचे अर्ज बाद झाले आहेत. आता निवडणूक रिंगणात 162 उमेदवारी अर्ज उरले असून, त्यापैकी कोण-कोण माघार घेणार, यावर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. तरीही खासदार उदयनराजे भोसले व बँकेचे अध्यक्ष खासदार नितीन पाटील यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग सुकर झाल्याचे मानले जात आहे.

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जांच्या छाननीत 12 जणांचे अर्ज बाद झाले आहेत. त्यामध्ये बाळकृष्ण किसन माळी, दीपाली यशवंत साळुंखे, सचिन तुकाराम माळी, लहूराज गणपती जाधव, जगदीश दिनकरराव जगताप, प्रकाश ज्ञानू बडेकर, भीमदेव बाबा बुरुंगले, पराग शंकर रामुगडे, रामचंद्र नाथा ढेकळे आदींचा समावेश आहे. गृहनिर्माण संस्था मतदारसंघातून खासदार उदयनराजे भोसले, तर वाई सोसायटी मतदारसंघातून विद्यमान अध्यक्ष खासदार नितीन पाटील यांची बिनविरोध निवड होईल, असे मानले जात आहे.

तथापि, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत नाटय़मय राजकीय घडामोडी सुरू असल्यामुळे ही निवडणूक रंगतदार अवस्थेत आहे. कोण माघार घेणार आणि कोणाला कात्रजचा घाट दाखवला जाणार, यावर निवडणुकीचे चित्र ठरणार आहे. निवडणूक पक्षीय पातळीवर घेऊन जाण्याचा काहींचा मनसुबा होता. मात्र, जिह्यातील दिग्गज नेत्यांनी पक्षीय जोडे बाहेर ठेवण्याचे धोरण ठेवल्यामुळे या मनसुब्यांचे काय होणार, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष आहे.