
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी 10 ऑक्टोबर रोजी दिल्लीतील जंतर-मंतर येथे प्रस्तावित करण्यात आलेल्या आंदोलनाला भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी पाठिंबा दर्शवला आहे. या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन भारतीय किसान युनियनच्या उत्तर प्रदेश युवा प्रदेशाध्यक्ष अनुज सिंह यांनी केले आहे.
अनुज सिंह यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ जारी करून कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने दिल्लीला पोहोचण्याचे आवाहन केले. तसेच आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांनी आंदोलकांशी संघर्ष टाळावा, असेही त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या पोस्टमध्ये शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर बॅरिकेड तोडण्यासाठी तयार असल्याचा दावा करण्यात आला असून, ‘ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा’, अशी मागणी करण्यात आली आहे.
We thank Rakesh Tikait ji and the Bharatiya Kisan Union for their support to CJP’s call for the protest at Jantar Mantar on 10 October.
See you in Delhi. ✊
— Cockroach Janta Party – CJP (@Cockroachisback) October 7, 2026
अनुज सिंह यांनी आपल्या व्हिडीओमध्ये मतदानाच्या अधिकाराचा मुद्दा उपस्थित केला. संविधानाने प्रत्येक नागरिकाला दिलेल्या मतदानाच्या अधिकारावर गदा आणली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच केंद्र सरकार आणि सत्ताधारी भाजपवरही त्यांनी टीका केली. ‘देशातील लोकशाही आणि नागरिकांच्या मतदानाच्या अधिकाराचे रक्षण करण्यासाठी सर्वांनी 10 ऑक्टोबर रोजी जंतर-मंतरवर मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,’ असे आवाहन त्यांनी केले. हे आंदोलन केवळ एका संघटनेचे नसून नागरिकांच्या हक्कांसाठीचे आंदोलन असल्याचा दावाही त्यांनी केला.
दरम्यान, CJP कडून राकेश टिकैत आणि भारतीय किसान युनियनच्या पाठिंब्याचे स्वागत करण्यात आले आहे. 10 ऑक्टोबरच्या जंतर-मंतर आंदोलनाला पाठिंबा दिल्याबद्दल राकेश टिकैत आणि भारतीय किसान युनियनचे आभार मानत असल्याचे CJP ने म्हटले आहे.



























































