
दिल्लीतील शाहदरा जिल्ह्यातील सीमापुरी परिसरात बुधवारी मोठी दुर्घटना घडली. ईदगाह मच्छी मंडीजवळील पाच मजली इमारत अचानक कोसळली. या दुर्घटनेत इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. इमारत कोसळल्यानंतर लगतची दोन ते तीन घरेही त्याच्या विळख्यात आली. दुर्घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून दिल्ली पोलीस, अग्निशमन दल, महापालिका आणि सिव्हिल डिफेन्सच्या पथकांकडून बचावकार्य सुरू आहे. ढिगारा हटवून त्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत.
प्राथमिक माहितीनुसार दोन डझनहून अधिक नागरिक ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, प्रत्यक्षात किती जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत किंवा किती जण जखमी झाले आहेत, याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, अलीकडे दिल्ली-एनसीआरमध्ये झालेल्या भूकंपानंतर या इमारतीला काही ठिकाणी तडे गेले होते. त्यामुळे इमारत कमकुवत झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, इमारत कोसळण्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तपासानंतरच दुर्घटनेचे खरे कारण समोर येणार आहे.
इमारत कोसळल्यामुळे सीमापुरी गोलचक्कर, डीएलएफ भोपुरा आणि आसपासच्या रस्त्यांवरील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. दिल्ली वाहतूक पोलिसांनी नागरिकांना घटनास्थळाजवळ गर्दी करू नये किंवा वाहने उभी करू नयेत, असे आवाहन केले आहे. त्यामुळे रुग्णवाहिका आणि बचाव पथकांच्या वाहनांना घटनास्थळी पोहोचण्यास अडथळा निर्माण होणार नाही.



























































