जंतरमंतरवर प्रियांका गांधींचा रस्त्यावर ठिय्या, राहुल गांधींना पोलिसांनी घेतलं ताब्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी इंडिया आघाडीच्या खासदारांनी दिल्लीतील जंतरमंतरवर जोरदार निदर्शने सुरू केली आहेत. यावेळी पोलिसांनी विरोधी पक्षाच्या खासदारांना जंतरमंतरवर जाण्यापासून रोखले असता काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांनी रस्त्यावरच ठिय्या दिला. यावेळी पोलिसांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना ताब्यात घेतले.

रस्त्यावरच ठिय्या करणाऱ्या प्रियंका गांधी यांनी पोलिसांच्या वर्तणुकीवर तीव्र संताप व्यक्त केला. त्या म्हणाल्या, “जे खासदार फक्त निवडणूक आयुक्तांना भेटू इच्छितात, त्यांच्याशी हे अशा प्रकारे वागत आहेत. खासदारांना मारहाण केली जात आहे. पोलिसांनी मला जागोजागी ओरखडलं आहे आणि जमिनीवर पाडलं. आता आम्ही इथून हलणार नाही. त्यांनी त्यांचे पोलीस दल मागे घेतले तरीही मी इथून हलणार नाही.”

टीव्ही९ भारतवर्षने दिलेल्या वृत्तानुसार, पोलिसांनी प्रियंका गांधी यांनाही जबरदस्तीने उठवले आणि बसमध्ये बसवून दुसऱ्या ठिकाणी नेले. तसेच ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात निदर्शने करणारे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनाही थोड्याच वेळात दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांनाही बसमधून दुसरीकडे नेण्यात आले.