लातूर-झहिराबाद महामार्गावर म्हसोबावाडीजवळ दुचाकींची धडक; आयटीआयच्या विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
लातूर-झहिराबाद महामार्गावरील म्हसोबावाडी पाटीजवळ दोन मोटरसायकलची समोरासमोर भीषण धडक होऊन आयटीआयमध्ये शिकणाऱ्या एका १८ वर्षीय विद्यार्थ्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. ७) सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. प्रफुल्ल काळे (वय १८, रा. माळेगाव कल्याणी, ता. निलंगा) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.
​मिळालेल्या माहितीनुसार, प्रफुल्ल काळे हा आपल्या मुळगावाहून (माळेगाव कल्याणी) मोटर सायकलवरून निलंगा येथील आयटीआय कॉलेजमध्ये येत होता. तो म्हसोबावाडी पाटीजवळ पोहोचला असता, समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या दुसऱ्या मोटरसायकलने त्याच्या वाहनाला जोराची धडक दिली. या भीषण अपघातात प्रफुल्लच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघात घडताच स्थानिक नागरिकांनी त्याला तात्काळ निलंगा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले; मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. मयत तरुणाच्या प्रेताचे शवविच्छेदन करून वैद्यकीय अधिकाऱ्याने अंत्यविधीसाठी प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे सदरील तरुणावर माळेगाव कल्याणी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
सामोरून येणाऱ्या दुचाकीवर वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करत तब्बल तिघे जण बसले होते. अत्यंत बेजबाबदारपणे आणि भरधाव वेगात गाडी चालवल्यामुळेच हा अपघात घडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अपघातानंतर धडक देणारा दुचाकीचालक व त्याचे दोन्ही साथीदार घटनास्थळावरून पसार झाले. औराद पोलिसांनी दोन्ही वाहने ताब्यात घेतली असून, पसार झालेल्या चालकासह तिघांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
​हेल्मेट गाडीला अडकवले, डोक्याला नाही!
मृत प्रफुल्ल काळे याच्याकडे हेल्मेट उपलब्ध होते. मात्र, त्याने ते डोक्यात न घालता गाडीला अडकवून ठेवले होते. जर अपघाताच्या वेळी त्याचे हेल्मेट डोक्यात घातलेले असते, तर कदाचित त्याचा जीव वाचू शकला असता. थोड्याशा निष्काळजीपणामुळे एका निष्पाप तरुणाला प्राण गमवावे लागले. “प्रत्येक दुचाकीस्वाराने प्रवासादरम्यान स्वतःच्या सुरक्षेसाठी अनिवार्यपणे हेल्मेटचा वापर करावा, जेणेकरून अशा दुर्दैवी दुर्घटना टळू शकतील.” असे हनुमंत बांगर, सहाय्यक पोलीस निरीक्षक, औराद पोलीस ठाणे यांनी सांगितले आहे.