ज्ञानेश कुमार चोर है! चिपळूणात मतचोरी विरोधात महाविकास आघाडीचा दणदणीत मोर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

“या मोदी सरकारचे करायचे काय? खाली डोके वर पाय! नागपूरच्या टरबुजाचे करायचे काय? खाली डोके वर पाय! निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हाय हाय… व्होट चोर गद्दी छोड… व्होट चोर कहाँ मिलेंगे, बीजेपी के दफ्तर में… विधायक चोर कहाँ मिलेंगे, बीजेपी के दफ्तर में… प्रभू राम के चंदा चोर कहाँ मिलेंगे, बीजेपी के दफ्तर में… बलात्कारी, जुमलेबाज कहाँ मिलेंगे, बीजेपी के दफ्तर में… पेपर चोर कहाँ मिलेंगे, बीजेपी के दफ्तर में… अंधभक्त कहाँ मिलेंगे, बीजेपी के दफ्तर में… ज्ञानेश कुमार चोर है!” अशा जोरदार घोषणा देत आज महाविकास आघाडीने चिपळूण शहरात दणदणीत मोर्चा काढला.

निवडणूक आयोगाच्या भ्रष्ट कारभाराविरोधात, तसेच मुख्य निवडणूक आयुक्त राजेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी महाविकास आघाडीतर्फे आज, बुधवारी चिपळूणमध्ये मोर्चा काढण्यात आला. यावेळी शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव आणि माजी खासदार हुसेन दलवाई यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर जिप्सी कॉर्नरसमोर झालेल्या सभेत आमदार भास्कर जाधव, माजी खासदार हुसेन दलवाई आदींची तडाखेबंद भाषणे झाली. त्यानंतर हातात तिरंगा ध्वज घेऊन आणि सरकारविरोधी घोषणा देत मोर्चाला सुरुवात झाली.

चिंचनाका-भोगळेमार्गे हा मोर्चा प्रांत कार्यालयावर धडकला. तेथे मान्यवर नेत्यांनी प्रांताधिकारी आकाश लिंगाडे यांच्यासमोर आपली भूमिका मांडून रीतसर निवेदन सादर केले. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव, चिपळूण विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम, काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सोनल लक्ष्मी घाग, आशिष जाधव, भरत लबधे, फैसल कास्कर, बळीराम गुजर, सुभाष जाधव, सचिन चोरगे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाच्या जिल्हाध्यक्षा दीपिका कोतवडेकर, जिल्हाध्यक्ष बारक्याशेठ बने, तालुकाध्यक्ष अविनाश केळसकर, शिरीष काटकर, इम्तियाज मुकादम, अक्षय केदारी यांच्यासह मान्यवर पदाधिकारी, शेतकरी आणि सामान्य नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

‘एसआयआर’मधील चुकांची शिक्षा म्हणून ज्ञानेश कुमार यांना भर चौकात फटकवा – आमदार भास्कर जाधव

या देशात अघोषित आणीबाणी सुरू आहे. अत्याचार सुरू आहेत. हुकूमशाही सुरू आहे. या देशाचे पंतप्रधान फक्त ‘मन की बात’ करतात, ‘जनता की बात’ ते ऐकत नाहीत. गेल्या १२ वर्षांत त्यांनी एकही पत्रकार परिषद घेतली नाही, कारण त्यांना प्रश्नांची उत्तरे देता येत नाहीत. फक्त त्यांचेच म्हणणे ऐकायचे. गेल्या १२ वर्षांत देशाची प्रचंड अधोगती झाली, असा आरोप शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांनी केला.

निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी ‘एसआयआर’च्या माध्यमातून उघड-उघड मतचोरी सुरू केली आहे. या देशात गेली १२ वर्षे मतचोरी सुरू आहे. ईव्हीएममधून मते चोरली. मतदानाच्या दिवशी काही नावे मतदार यादीतून गायब केली. काही ठिकाणी बोगस मतदान केले आणि आता ‘एसआयआर’मधून मतचोरी सुरू आहे. पश्चिम बंगालमध्ये ८९ लाख मतदारांची नावे कमी केली. त्यापैकी ३७ लाख मतदारांनी अर्ज करून ‘आमची नावे का वगळली?’ अशी विचारणा केली, पण निवडणूक आयोगाने त्यांची सुनावणी घेतली नाही. आज महाराष्ट्रातील २ कोटी ७ लाख मतदारांची नावे वगळली, ही लोकशाही आहे का? लोकसभा, विधानसभा, नगरपरिषद, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत या २ कोटी ७ लाख मतदारांनी तुम्हाला मतदान केले, ते बोगस होते का? असा सवाल आमदार भास्कर जाधव यांनी विचारला.

‘एसआयआर’ची प्रारूप यादी जाहीर झाल्यानंतर प्रत्येक गावातील ५० ते १०० मतदारांची नावे कमी करून त्यांना नोटीस पाठवली जात आहे. कुणाची मात्रा चुकली, कुणाच्या वडिलांचे आणि मुलाचे वय जुळत नाही, कोण इथं कसा आला त्याचा पत्ता लागत नाही. या चुका काय बीएलओने (BLO) केल्या? यादी तुमच्या बीएलओने केली, चुका त्यांनी केल्या, मग त्याची शिक्षा आम्हाला का? त्याची शिक्षा ज्ञानेश कुमार यांना भर चौकात फटके मारून द्या, अशी मागणी आमदार भास्कर जाधव यांनी केली. ६ नंबरचा अर्ज भरून नवीन नावे घेण्याचा किंवा वगळण्याचा स्थानिक अधिकाऱ्यांचा अधिकार काढून घेण्यात आला आहे. ज्ञानेश कुमार सांगतात की, ६ नंबरचा अर्ज भरण्याचा अधिकार आम्ही सर्वोच्च न्यायालयातून आणला आहे, पण काल-परवाच सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, आम्ही असा कुठलाच अधिकार दिला नाही. ज्ञानेश कुमार एवढे खोटारडे आहेत, असा घणाघाती आरोप आमदार भास्कर जाधव यांनी केला.