आभाळमाया – चकाके ‘कोर’ शुक्राची!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वैश्विक [email protected]

आकाशीचा चंद्र हा जगभरच्या साहित्यातला आवडता विषय. त्यामुळे आपल्या मराठीतही चंद्रावर अनेक गाणी आहेत. चंद्र आणि चंद्रकोरींचं विलोभनीय दर्शन आणि त्यावर आधारित सण हा आपल्या संस्कृतीचा अवकाशाची नातं सांगणारा भाग. फार पूर्वी ‘चकाके कोरे चंद्राची’ हे कवी स. अ. शुक्ल यांनी लिहिलेलं गाणं गंगूबाई हनगल आणि जी. एन. जोशी यांनी गायिलं होतं.

त्या काळात (किंवा आताही) शुक्राचीसुद्धा ‘कोर’ असते याची कल्पना सर्वसामान्यांना असणं शक्य नसतं. चंद्रकोर कशी सहज दिसणारी. त्यामुळे ‘बघुनी तुला गगनात खंगते कलेकलेने चंद्रकला’ अशा काव्यपंक्ती लिहिल्या गेल्या. शुक्र ग्रह मात्र काव्यात ‘चांदणी’ पिंवा ‘तारा’ झाला. स्वयंप्रकाशी नसलेला, पण त्यावरील सल्फर-कार्बनच्या दाट ढगांमुळे अधिक सूर्यप्रकाश परावर्तित करणारा शुक्र तेजाळ तारा ‘वाटणं’ तेव्हा साहजिक होतं. अर्थात, गॅलिलिओ यांनी दुर्बिण अवकाशाकडे रोखल्यावर 1610 पासूनच अनेक ग्रहांचं सहीसही दर्शन झालं. त्यांचं खरं रूप (फीचर्स) समजायला सुरुवात झाली आणि गेल्या शतकभरात तर जगातल्या हजारो खगोलप्रेमींच्या हाती दुर्बिणी आल्या. त्यातून ग्रह तारे न्याहाळण्याचे रात्रभराचे कार्यक्रम होऊ लागले. गेली 40 वर्षे आम्हीही ते केले. अवकाशाचा अपूर्व आनंद मिळवला.

त्यामध्ये अनेकदा शुक्राची ‘कोर’ पाहण्याचा योग आला. शुक्राची कला खूप मोठी (एकादशीच्या चंद्राप्रमाणे) असते. त्या वेळी त्यावरून परावर्तित होणारा सूर्यप्रकाश ‘शुक्राचं चांदणं’ आपल्या चेहऱ्यावर पडेल इतपत शक्तिशाली दुर्बिणीतून प्रकाशित दिसेल असं वाटेल, पण तसं नसतं. आठ ते दहा इंच व्यासाचा आरसा असलेल्या दुर्बिणीतून शुक्राची कोरच खरोखर मनोहारी दिसते. त्या सगळय़ाचं स्मरण होण्याचं कारण सध्या त्या तेजस्वी शुक्रकोरीचं दर्शन होतंय. चार-पाच दिवसांपूर्वी शुक्राची चकाकती आणि चंद्रकलेसारखीच दिसणारी कोर पाहण्याचा योग आला. संध्याकाळच्या आकाशात क्षितिजाजवळचा शुक्र स्पष्ट दिसण्याइतका आकाशाचा निरभ्र तुकडा या दिवसात क्वचितच मिळतो, पण तशी संधी मिळाली आणि चार इंची पॅसिग्रेनियन दुर्बिणीतून शुक्राची क्षीण पण तेजस्वी कोर पाहता आली.

अर्थात, त्यासाठी मुंबईपासून सत्तर-ऐंशी किलोमीटर दूर काळोख्या जागी जावं लागलं. आकाशींची ‘दौलत’ अनुभवायची तेवढे कष्ट आणि वेळ यांची तरतूद करण्याची ‘श्रीमंती’ (मनात) असावीच लागते. मग मात्र विश्व तुम्हाला विस्मयकारी रूपं दाखवतं!

आता शुक्राच्या या कला पिंवा ‘फेजेस’मागचं खगोल-विज्ञान. शुक्राची कला दिसणं हा चंद्रकला दिसण्यासारखाच प्रकार आहे. मात्र तो चंद्रकोर दिसण्याइतका सहजसोपा नाही. तसा तो का नाही याचं उत्तर मात्र सोपं आहे. चंद्र आपल्या पृथ्वीचा अवघ्या 3 लाख 84 हजार किलोमीटर अंतरावरचा नैसर्गिक उपग्रह. शुक्र मात्र सूर्यमालेतला सूर्यापासूनच दुसरा स्वतंत्र ग्रह. आपल्या पृथ्वीचा तो आपल्या वर्तुळातला शेजारी. पृथ्वीपासूनचं त्याचं सरासरी अंतर 4 कोटी 10 लाख किलोमीटर. अर्थात, ग्रहमालेतले सर्वच ग्रह सूर्याभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत फिरत असल्याने ते कधी एकमेकांपासून दूर जातात, तर कधी जवळ येतात. आता हे अंतर सुमारे 3 कोटी 84 लाख किलोमीटर आहे.

सध्या शुक्र पृथ्वीच्या ‘जवळ’ आहे. त्यामुळे त्याची कोर आपल्याला दिसू शकते. ती शुक्राच्या ‘चतुर्थी’च्या स्वरूपातील आहे. शुक्रदर्शनाची गंमत अशी की, तो आपल्याला पूर्णपणे कधीच दिसत नाही. ठसठशीत दिसतो. तेव्हासुद्धा तो पाऊणपट पिंवा 80 टक्के दिसतो. त्याला त्याचं ‘गिब्बस’ रूप म्हणतात. ‘गिब्बस’ म्हणजे एखाद्या वर्तुळाकार वस्तूचा निम्म्यापेक्षा अधिक भाग दिसणे. शुक्र ‘गिब्बस’ दिसतो त्या वेळी तो पृथ्वीपासून खूप लांबच्या कक्षेत आणि सूर्यापलीकडच्या भागात असतो. आता तो जवळ असल्याने त्याची सुंदरशी ‘कोर’ दिसतेय.

गेल्या आठवडय़ात ती अधिक चांगली दिसली. त्यापूर्वीही अनेक ठिकाणांहून म्हणजे अभ्राच्छादित आकाश नसलेल्या ठिकाणांहून दिसली असेल, परंतु तो काळ आपल्याकडे पावसाळ्याचा होता. पाऊस खूप झाला नाही तरी क्षितिजावर सतत रेंगाळणारे ढग होतेच. परिणामी, मावळतीनंतर थोडाच काळ दिसणारी शुक्राची नाजूक कोर दिसणं शक्य नव्हतं. पाऊस कमी होताच पश्चिम क्षितिज ‘क्लिअर’ मिळून चंद्रप्रकाशाचा ‘अडथळा’ नसेल तर शुक्रकोर अधिक छान दिसते.

आपली पृथ्वीसुद्धा आपल्याला अजून नीट समजलेली नाही. ग्रहमालेतील रहस्य तर अनंत आहेत, परंतु सतत काही वर्षे अभ्यास केला तर त्यातल्या ‘अमेझिंग’ पिंवा विस्मयकारी गोष्टी समजून येतात. अवकाश दर्शन अगदीच ‘रुक्ष’ नसतं तर ते अनेक गमती दाखवणारं असतं याची प्रचीती येते. त्यासाठी निरीक्षणाचं सातत्य मात्र हवं. त्यातही नजरेपुढे दुर्बिण असेल तर सोन्याहून पिवळे!