पडद्याआडून – शुभं करोति, घराच्या चौकटीतल्या स्वप्नांची गोष्ट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> पराग खोत

‘नाटकातलं घर नाही… घराघरातलं नाटक…’ अशी ओळख घेऊन रंगभूमीवर आलेलं ‘शुभं करोति’ हे नावाप्रमाणेच मंगल विचारांचा धागा पकडणारं नाटक आहे. मात्र या नाटकाचं खरं वैशिष्ट्य त्याच्या विषयातल्या मोठ्या नाट्यमयतेत नसून, अगदी ओळखीच्या काैटुंबिक प्रश्नांकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात आहे. एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबाच्या चौकटीतून आजच्या पिढीची स्वप्नं, पालकांची काळजी, अपेक्षा आणि मुलांच्या अपयशानंतरची त्यांना दिलेली साथ यांचा वेध हे नाटक समर्थपणे घेतं.

वैभव जोशी यांच्या लेखणीतून साकारलेली ही कथा आजच्या अनेक घरांची आहे. मुलाने कोणतं करीअर निवडावं, त्याने घेतलेल्या निर्णयावर विश्वास ठेवायचा की त्याच्या भवितव्याची चिंता करायची आणि तो अपेक्षेप्रमाणे यशस्वी झाला नाही तर त्याच्याकडे कसं पाहायचं हे प्रश्न वरवर साधे वाटले तरी त्यामागे पालकत्व, स्वातंत्र्य, प्रेम आणि असुरक्षितता अशा अनेक भावना दडलेल्या असतात. ‘शुभं करोति’ या भावनांना उपदेशाच्या चौकटीत अडकवत नाही, तर कुटुंबातील संवाद आणि प्रसंगांतून त्यांना आकार देण्याचा प्रयत्न करतं. नाटकाचा केंद्रबिंदू असलेला तरुण मुलगा स्वतःच्या आयुष्याबद्दल आणि करीअरबद्दल वेगळं स्वप्न पाहतो. त्याचं स्वप्न आणि आई-वडिलांची स्वप्नं एकच असतीलच असं नाही. इथेच नाटकाला संघर्षाची धार मिळते. आजची तरुण पिढी ‘माझं आयुष्य, माझा निर्णय’ म्हणते; तर मागची पिढी ‘आम्ही तुझ्या भल्यासाठीच सांगतो’ या भूमिकेत उभी असते. दोन्ही बाजू चुकीच्या नसतात, पण दोघांमध्ये संवाद हरवला की घरातला शांतपणा ताणात बदलतो. या परिचित वास्तवाला नाटक रंगमंचावर आणतं.

विश्वंभर आणि रुक्मिणी या मध्यमवर्गीय दांपत्याचा एकुलता एक मुलगा मंदार आणि त्याची मैत्रीण संवादिनी या चार पात्रांची ही गोष्ट. इंजिनीअरिंगची दोन वर्षे पूर्ण झाल्यावर मंदारला आता शिक्षण सोडून व्यवसाय करायचाय. त्याला त्याच्या मैत्रिणीची साथ आहे. घरच्यांची समजूत काढून ते हा व्यवसाय सुरू करतातही आणि नंतर जे घडतं  ते म्हणजे हे नाटक. लेखकाने या कथेत केवळ संघर्ष मांडण्यापेक्षा अपयशाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही ठळक केलाय. यशाच्या वेळी आपल्या माणसांबरोबर असणं सोपं असतं; पण अपयशाच्या वेळी त्यांच्याबरोबर उभं राहणं ही खरी कसोटी. कुटुंबाची खरी ताकद याच क्षणी जाणवते. त्यामुळे ‘शुभं करोति’चा भावनिक गाभा केवळ मुलांच्या स्वप्नांमध्ये नाही, तर त्या स्वप्नांवर विश्वास ठेवण्याची आणि मुलांना त्यांच्या अपयशापलीकडे जाऊन पाहण्याची पालकांची तयारी यात आहे. या कथेला दिग्दर्शक भाग्येश रानडे यांनी आजच्या काळाशी जोडताना परंपरेचा धागाही जपला आहे. श्लोक आणि संतसाहित्यातील विचार कथेत सहजपणे गुंफण्याचा प्रयत्न हे नाटकाचं वेगळेपण ठरतं. महत्त्वाचं म्हणजे, हे विचार स्वतंत्र ‘उपदेश’ म्हणून न येता कथानुभवाचा भाग व्हावेत ही दिग्दर्शकीय भूमिका आहे. त्यामुळे जुन्या संस्कारांचा आणि नव्या पिढीच्या प्रश्नांचा संवाद घडवण्याची संधी नाटकाला मिळते.

अभिनयाच्या पातळीवरही नाटकाची निवड लक्षवेधी आहे. अभिनय बेर्डे हा तरुण चेहरा या कुटुंबकथेच्या मध्यभागी आहे, तर सीमा देशमुख आणि हृषिकेश जोशी यांसारखे अनुभवी कलाकार पालकांचे भावविश्व अधोरेखित करतात. अपूर्वा गोरे या चौघांच्या काैटुंबिक समीकरणात वेगळा रंग देतात. विशेषतः अशा काैटुंबिक नाटकात मोठय़ा संवादांपेक्षा व्यक्तिरेखांमधील सहजपणा आणि परस्परांमधील केमिस्ट्री महत्त्वाची ठरते. या चौकटीत कलाकारांची निवड नाटकाच्या विषयाला साजेशी आहे. मात्र काही प्रसंगांची आणि संवांदांची पुनरावृत्ती टाळता आल्यास उत्तम. सुरुवातीला संथ वाटणारं नाटक नंतर वेग घेतं खरं, पण ते एका रेषेत जातं. नाटकातील चढउतार आणि संघर्ष अधिक टोकदार व्हायला हवेत. प्रश्न निर्माण झाला की लगेच उत्तर सापडतं असं व्हायला नको.

‘शुभं करोति’चं आणखी एक बलस्थान म्हणजे त्याचा विषय घराघरातला असूनही तो केवळ रडवणाऱया काैटुंबिक नाटय़ापर्यंत मर्यादित राहत नाही. ज्या घरात प्रेम असतं, तिथे अपेक्षा असतात; अपेक्षा असतात म्हणून कधी मतभेदही होतात. पण मतभेद म्हणजे नात्यांचा शेवट नव्हे, तर एकमेकांना नव्याने समजून घेण्याची संधी असू शकते हा नाटकाचा आशय आहे. ‘शुभं करोति’ म्हणजे शेवटी मंगलाची इच्छा. या नाटकाचं मंगल हे केवळ एखाद्या कुटुंबाचं नाही; ते घरातल्या संवादाचं, स्वप्नांना मिळणाऱ्या विश्वासाचं आणि अपयशातही नातं न तुटण्याचं आहे. म्हणूनच पडदा पडल्यानंतरही प्रेक्षकांच्या मनात एक प्रश्न राहतो, आपण आपल्या घरातल्या माणसांना खरंच समजून घेतोय का? आणि हा प्रश्न जर घरापर्यंत पोहोचला तर ‘शुभं करोति’चा प्रयोग सार्थकी लागला असं म्हणायला हरकत नाही.

नाटकाच्या शीर्षकाचीही इथे गंमत आहे. ‘शुभं करोति’ हा शब्दप्रयोग आपल्याला दिवेलागणीच्या, संस्कारांच्या आणि घरच्या वातावरणाच्या आठवणींशी जोडतो. त्याच शीर्षकाला आजच्या तरुणाईच्या आकांक्षांशी जोडताना नाटक एक सूचक प्रश्न विचारतं, संस्कार म्हणजे फक्त परंपरा जपणं की बदलत्या काळात माणसाला समजून घेणं? परंपरेचा अर्थ स्थिर राहणं नसून, माणसांना जोडणारी मूल्यं नव्या संदर्भात जिवंत ठेवणं हा विचार या नाटकाच्या आशयातून उमटतो. वैभव जोशी हे कवी म्हणून परिचित असले तरी नाटककार म्हणून त्यांनी निवडलेला विषय भाषेच्या अलंकारापेक्षा भावनांच्या साधेपणाची मागणी करणारा आहे. व्यावसायिक रंगभूमीवर काैटुंबिक विषयाला नव्या पिढीच्या प्रश्नांशी जोडण्याचा हा प्रयत्न म्हणूनही या नाटकाकडे पाहता येईल.

  • लेखक – वैभव जोशी
  • दिग्दर्शक  भाग्येश रानडे
  • कलाकार – अभिनय बेर्डे, अपूर्वा गोरे, सीमा देशमुख, हृषिकेश जोशी
  • नेपथ्य – सुमीत पाटील
  • प्रकाश योजना – तेजस देवधर
  • संगीत – अजित परब
  • निर्माता – श्रीरंग खापर्डे, सिद्धार्थ गोखले, नितीन वैद्य, राहुल अवस्थी
  • सूत्रधार – अजय कासुर्डे
  • छायाचित्र सौजन्य – संजय पेठे