अलिबागच्या पाझर तलावात दोन चिमुकल्यांचा बुडून मृत्यू; खेळता खेळता तोल गेल्याने दुर्घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नवगाव परिसराच्या रामधरनेश्वर पाझर तलावात बुडून दोन चिमुकल्या मुलींचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आशिका पवार (३) आणि संजना पवार (८) अशी मृत मुलींची नावे आहेत. या घटनेमुळे रामधरनेश्वर आदिवासी वाडी तसेच नवगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. खेळता खेळता तोल गेल्याने ही दुर्घटना घडली आहे.

आशिका पवार, संजना पवार आणि त्यांची मैत्रीण माई वाघमारे या तिघी खेळत असताना पाझर तलावाच्या परिसरात गेल्या होत्या. खेळता खेळता आशिका आणि संजना या दोघींचा तोल गेला आणि त्या तलावात बुडाल्या. हा प्रकार लक्षात येताच माई हिने तातडीने आदिवासी वाडीवर धाव घेत या घटनेची माहिती गावकऱ्यांनी दिली. त्यानंतर नागरिकांनी तलावाकडे धाव घेत दोन्ही मुलींना पाण्यातून बाहेर काढले. अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यद्यकीय अधिकाऱ्यांनी दोघींनाही मृत घोषित केले.

कुटुंबावर दुःखाचा डोंगर

दोन्ही मुली तलावापासून काही अंतरावर असलेल्या आदिवासी वाडीत राहत होत्या. त्यांच्या दुर्दैवी मृत्यूची बातमी समजताच पवार कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान याच पाझर तलावात काही महिन्यांपूर्वी २४ वर्षीय तरुणाचा पोहताना बुडून मृत्यू झाला होता. त्यामुळे या तलावाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. तलाव परिसरात सुरक्षिततेच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.