Ratnagiri News – संगमेश्वर तालुक्यातील धरणे पूर्ण क्षमतेने भरली; कालव्यांसाठी अजूनही कोट्यवधींची प्रतीक्षा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संगमेश्वर तालुक्यात यावर्षी सरासरीच्या सुमारे ६५ टक्के पाऊस झालेला असतानाही तालुक्यातील प्रमुख धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. रांगव, गडनदी आणि गडगडी नदी प्रकल्पांतील धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. मात्र, धरणांमध्ये पाणी उपलब्ध असतानाही त्याचा शेतीसाठी अपेक्षित वापर करण्यासाठी आवश्यक असलेल्या कालव्यांची कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे या कालव्यांच्या कामांसाठी शासनाकडून कोट्यवधी रुपयांच्या निधीची प्रतीक्षा आहे.

तालुक्यातील गडनदी धरण हा सर्वात मोठा प्रकल्प असून त्यामध्ये सुमारे ८३ दलघमी पाणीसाठा आहे. रांगव प्रकल्पात ५.५२ दलघमी, तर गडगडी नदी प्रकल्पात ७.४४ दलघमी पाणीसाठा आहे. यामुळे पाणीसाठ्याच्या दृष्टीने यंदाचे चित्र समाधानकारक असले तरी कालव्यांच्या अपूर्ण कामांमुळे या पाण्याचा सिंचनासाठी पूर्ण क्षमतेने उपयोग करण्याचे आव्हान कायम आहे.

रांगव, गडनदी आणि गडगडी नदी प्रकल्पांच्या कालव्यांसाठी सुधारित प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आले आहेत. यामध्ये रांगव प्रकल्पासाठी ६३ कोटी ७४ लाख रुपये, गडनदी प्रकल्पासाठी १ हजार १६२ कोटी रुपये, तर गडगडी नदी प्रकल्पासाठी ४९५ कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध असूनही कालव्यांची कामे पूर्ण न झाल्याने शेतकऱ्यांना सिंचनाचा अपेक्षित लाभ मिळत नाही. त्यामुळे शासनाने सुधारित प्रस्तावांना मंजुरी देऊन आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

याबाबत पाटबंधारे विभागाचे देवरुख येथील उपअभियंता राजेंद्र मोहिते यांनी सांगितले की, रांगव, गडनदी आणि गडगडी नदी प्रकल्पांच्या कालव्यांसाठी सुधारित प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आले आहेत. प्रस्तावांना मंजुरी मिळाल्यानंतर निधी उपलब्ध करून घेऊन आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केली जाईल आणि त्यानंतर कालव्यांच्या कामांना तातडीने सुरुवात करण्यात येईल. धरणे भरली, पाणी उपलब्ध झाले; आता कालव्यांना निधी मिळून कामे प्रत्यक्षात सुरू होण्याची प्रतीक्षा शेतकरी करत आहेत.