अंबानी हेच हिंदुस्थानचे खरे मालक आहेत का? स्टारलिंकच्या विलंबावरून एलॉन मस्क आक्रमक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानामध्ये ‘स्टारलिंक’ची सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक नियामक मंजुरी मिळण्यास होत आहे. याच होणाऱ्या विलंबावरून उद्योगपती आणि ‘स्पेसएक्स’चे संस्थापक एलॉन मस्क यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. हिंदुस्थानात आपल्या सॅटेलाइट इंटरनेट सेवेच्या प्रवेशात काही बड्या उद्योगपतींकडून अडथळे आणले जात असल्याचा आरोप केल्यानंतर मस्क यांनी आता थेट रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्यावर निशाणा साधला आहे. अंबानी हेच भारताचे खरे मालक आहेत का? असा सवाल त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर केला आहे.

मस्क यांनी हिंदुस्थानात स्टारलिंकला अद्याप व्यावसायिक सेवा सुरू करण्याची परवानगी का मिळालेली नाही, असा प्रश्न उपस्थित केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, स्टारलिंकला जगभरातील १६५ हून अधिक देशांमध्ये परवाने मिळाले आहेत. हिंदुस्थानातील कायदे आणि तांत्रिक अटींचे पालन करण्यासाठी कंपनीने पाच वर्षे काम केले आहे, तरीही सेवा सुरू करण्यास विलंब का होत आहे, असा सवाल त्यांनी केला. मस्क यांनी यापूर्वी हिंदुस्थानातील स्टारलिंकच्या प्रवेशाला काही ‘ओलिगार्क्स’ म्हणजेच धनदांडगे उद्योगपती अडथळा आणत असल्याचा आरोप केला होता. हिंदुस्थानी जनतेवर आपली मक्तेदारी कायम ठेवण्यासाठी काही बड्या उद्योगपतींकडून आम्हाला रोखले जात आहे. हा हिंदुस्थानी जनतेविरुद्धचा गुन्हा आहे, असा दावा त्यांच्याकडून करण्यात आला होता.

केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार, एलॉन मस्क यांची स्टारलिंक, रिलायन्स जिओची ‘जिओ सॅटकॉम’ आणि भारती समूहाच्या पाठिंब्याची ‘यूटेलसॅट वनवेब’ या तिन्ही कंपन्यांना परवाने देण्यात आले आहेत. मात्र, आवश्यक सुरक्षा तपासणी आणि स्पेक्ट्रमशी संबंधित मंजुरी पूर्ण झाल्यानंतरच या कंपन्यांना व्यावसायिक सेवा सुरू करता येणार आहे. दरम्यान, मस्क यांच्या आरोपांवर रिलायन्स जिओचे अध्यक्ष आकाश अंबानी यांनी थेट प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.