
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि मतदार याद्यांमधील गैरव्यवहारांच्या विरोधात इंडिया आघाडीने पुकारलेले आंदोलन आता अधिक आक्रमक झाले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस समितीचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहा हे देशातील लोकशाही संपवण्याचा घाट घालत असून, हिंदुस्थानातील लोकशाहीला उद्ध्वस्त करण्यासाठीच त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांसोबत मिळून हा गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचला आहे,” असा घणाघाती आरोप वेणुगोपाल यांनी केला आहे.
के.सी. वेणुगोपाल म्हणाले की, निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेवर घाला घातला जात असून, आमचे हे आंदोलन देशाच्या इतिहासातील आतापर्यंतच्या सर्वात शक्तिशाली आणि मोठ्या जनआंदोलनांपैकी एक ठरेल. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर काम करत निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता धोक्यात आणल्याचा दावाही त्यांनी केला.
गेल्या काही दिवसांपासून इंडिया आघाडीच्या खासदारांनी दिल्लीत निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा, जंतरमंतरवरील निदर्शने आणि राजघाटावर धरणे आंदोलन करत आपला तीव्र निषेध नोंदवला आहे. या सर्व घटनाक्रमाचा संदर्भ देत वेणुगोपाल म्हणाले की, जोपर्यंत ज्ञानेश कुमार आपल्या पदाचा राजीनामा देत नाहीत आणि वगळण्यात आलेल्या कोट्यवधी मतदारांची नावे पुन्हा यादीत समाविष्ट केली जात नाहीत, तोपर्यंत विरोधकांचा हा लढा असाच सुरू राहील.




























































