
मतदार यादी पुनरिक्षण प्रकिया (एसआयआर) आणि निवडणूक आयोगातील भ्रष्ट कारभाराविरोधात कॉक्रोच जनता पार्टी 10 ऑक्टोबर रोजी दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलन करणार आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत कडेकोट बंदोबस्त केला जात असून जंतरमंतरला छावणीचे स्वरुप आले आहे. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून दिल्ली पोलिसांनी आणि रेल्वेने मोठे पाऊल उचलले असून आज रात्री 9 वाजल्यापासून पुढील आदेशापर्यंत 57 मेट्रो स्थानके बंद करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. तसेच शनिवारी पहाटे 4 ते दुपारी 2 या वेळेत नवी दिल्ली आणि हजरत निजामुद्दीने स्टेशनवरील रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. ‘इंडियन एक्सप्रेस‘ने याबाबत वृत्त दिले आहे.
दिल्ली पोलिसांच्या वाहतूक विभागाच्या संयुक्त आयुक्तांनी दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकांना पत्र लिहून सुरक्षा उपायांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. या पत्रात 57 प्रमुख मेट्रो स्टेशन्सचे दरवाजे बंद ठेवण्याचे तसेच ट्रेनची फ्रीक्वेन्सी कमी करण्याचे नमूद केले आहे. हे निर्बंध आज 9 ऑक्टोबर रोजी रात्री 9 वाजल्यापासून लागू होऊन परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे.
बंद राहणाऱ्या 57 स्टेशन्समध्ये राजीव चौक, केंद्रीय सचिवालय, नवी दिल्ली, पटेल चौक, मंडी हाऊस, आयटीओ, काश्मिरी गेट, हाऊस खास, पतियाळा हाऊस, सुप्रीम कोर्ट, खान मार्केट आणि लाजपत नगर यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या आणि मध्यवर्ती स्टेशन्सचा समावेश आहे.
Delhi | “In view of proposed protests and the likelihood of unruly mob movement, Delhi Metro entry/exit gates across 57 stations may be closed from 9:00 PM on October 9 till the situation normalizes on October 10,” according to a letter written by the Delhi Police to the DMRC. https://t.co/YXXHD2TVmU
— ANI (@ANI) October 9, 2026
10 तासांसाठी रेल्वे गाड्या रद्द
रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, 10 ऑक्टोबर रोजी पहाटे 4 ते दुपारी 2 या 10 तासांच्या कालावधीत नवी दिल्ली आणि हजरत निजामुद्दीन रेल्वे स्टेशनवर येणाऱ्या व जाणाऱ्या सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. गुरुवारी झालेल्या वाहतूक कोंडीमुळे सुमारे 5000 प्रवाशांची ट्रेन चुकल्याने प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. तसेच पूर्व रेल्वेने आज निघणाऱ्या 12301 हावडा-नवी दिल्ली राजधानी एक्स्प्रेस आणि 12313 सियालदह-नवी दिल्ली राजधानी एक्स्प्रेस या दोन्ही गाड्या रद्द केल्याची घोषणा केली आहे.



























































