
<< राखी अरदकर
[email protected]
आज मागे वळून पाहिल्यावर जाणवतं की, बालपण किती साधं होतं; पण त्या साधेपणात किती आनंद दडलेला होता. पाऊस थोडा कमी झाला की, दिवाळीच्या आसपास गवताची हिरवळ अजूनही जमिनीवर पसरलेली असायची. शेतात, माळावर, भात कापून झालेल्या शेतांमध्ये असंख्य भिंगऱ्या दिसायच्या. पिवळी भिंगरी, लाल भिंगरी, काळी, राखाडी… वेगवेगळ्या रंगांच्या त्या छोट्या उडत्या जिवांना पकडणं हाच आमचा तेव्हाचा एक मोठा उद्योग!
मोबाईल नव्हते, खेळण्यासाठी महागडी खेळणीही नव्हती. आमचं खेळाचं मैदान म्हणजे मोकळं शेत, गवत आणि निसर्ग. कोण किती भिंगऱ्या पकडतो, कोणत्या रंगाची पकडली, “तू किती पकडल्या?”, “राणी भिंगरी पकडली का?”, “लाल पकडली का?” यावर आमच्या गप्पा रंगायच्या. कधी एखाद्या भिंगरीला दोरा बांधून उडवण्याचा प्रयत्नही करायचो. घरचे मात्र लगेच ओरडायचे “एका जिवाबरोबर काय खेळताय तुम्ही?” तेव्हा त्यांचं म्हणणं फारसं मनावर घ्यायचो नाही. आम्हाला त्या भिंगऱ्या पकडण्याची, हातात घेण्याची आणि पुन्हा उडताना पाहण्याची विलक्षण उत्सुकता असायची. कधी पकडताना ती बोटाला चावायचीही. त्या चावण्याची थोडी भीती आणि दुखणं असायचं,पण आज कोणती भिंगरी पकडली याचा आनंद त्या दुखण्यापेक्षा मोठा असायचा.
भातकापणी झाल्यानंतर शेतात तर भिंगऱ्यांची जणू गर्दीच असायची. गवतावर बसलेल्या, अचानक पंख पसरून उडून जाणाऱ्या त्या भिंगऱ्यांच्या मागे आम्ही मुलं धावत असायचो. त्या छोट्याशा पाठलागात किती हसू, किती उत्साह आणि किती निरागस स्पर्धा होती!
आणि काल पुन्हा अनेक भिंगऱ्या दिसल्या … नेहमीप्रमाणे सहज बागेत फिरत होते. शेवंतीच्या झाडावर माझी नजर गेली आणि तिथे एक भिंगरी शांतपणे बसलेली दिसली. क्षणभर मी तिथेच थांबले. कॅमेरा काढून तिचा फोटो घेतला. पण खरं तर मी त्या क्षणी फक्त एक फोटो घेत नव्हते… मी माझं हरवलेलं बालपण पुन्हा एकदा टिपत होते.
त्या एका भिंगरीने कितीतरी वर्षांपूर्वीच्या आठवणींचं दार उघडलं. मोकळं शेत, पावसानंतरचं गवत, भाताची कापणी, मित्रमैत्रिणींची धावपळ, हातात पकडलेली रंगीबेरंगी भिंगरी आणि घरच्यांचा ओरडा…
आज आपल्या हातात मोबाईल आहे, फोटो काढण्यासाठी कॅमेरा आहे, जगाशी जोडण्यासाठी कितीतरी साधनं आहेत, पण त्या काळात निसर्गच आमचा खेळ होता आणि आजूबाजूचं जगच आमचं खेळणं होतं. कदाचित म्हणूनच त्या आठवणी अजूनही इतक्या जिवंत आहेत. आज त्या भिंगरीकडे पाहताना मनात एकच विचार आला,
किती सुंदर होतं ते बालपण…
जिथे आनंद विकत घ्यावा लागत नव्हता,
तो गवतामध्ये, शेतामध्ये, पावसानंतरच्या हवेत
आणि एका छोट्याशा भिंगरीच्या पंखांमध्ये सहज सापडायचा.
आज ती भिंगरी पुन्हा दिसली आणि जाणवलं, काळ कितीही पुढे गेला तरी काही आठवणी मनाच्या कोपऱ्यात तशाच जिवंत राहतात. त्या आठवणींना पुन्हा उजाळा देण्यासाठी कधी कधी एखादी छोटीशी भिंगरी, एखादं फूल, पावसाचा वास किंवा शेताची हिरवळ पुरेशी असते. बालपण पुन्हा हातात येत नाही, पण त्याच्या आठवणी मात्र आयुष्यभर आपल्यासोबत राहतात. आज बागेत दिसलेली ही भिंगरी माझ्यासाठी माझ्या सुंदर, निरागस बालपणाची पुन्हा एकदा झालेली भेट होती.


























































