पालघरसह पुणे, ठाणे जिल्ह्यांचे दोन्ही संघ बाद फेरीत; बंदिस्त डोममधील भव्य क्रीडानगरीने वाढवला स्पर्धेचा थाट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्पर्धा कुमार-कुमारी गटाची, पण मैदानावरील थरार, संघांची ताकद आणि विजयासाठीची झुंज थेट राष्ट्रीय स्पर्धेलाही टक्कर देणारी होती. प्रतिस्पर्ध्यांवर गुणांचा वर्षाव करत एकापाठोपाठ एक संघांनी विजयाची पताका फडकविल्याने 53 व्या कुमार कुमारी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत चुरस शिगेला पोहोचली आहे. यजमान पालघरसह पुणे, जालना आणि अहिल्यानगरच्या कुमार व कुमारी या दोन्ही गटांतील संघांनी दमदार विजयांच्या जोरावर बाद फेरीत धडक मारली आहे. मुंबई उपनगरने मुंबई शहरला धूळ चारत स्पर्धेतील आपले आव्हान अधिक भक्कम केले, तर ठाणे शहरानेही सलग विजयांची नोंद करत बाद फेरीतील स्थान निश्चित केले.

राज्य कबड्डी स्पर्धांच्या इतिहासात प्रथमच उभारण्यात आलेल्या बंदिस्त डोममधील भव्य क्रीडानगरीने या स्पर्धेला वेगळीच उंची मिळवून दिली आहे. पालघर जिल्हा कबड्डी संघटनेने वसई-विरार महानगरपालिकेच्या सहकार्याने उभारलेली ही क्रीडानगरी आणि स्पर्धेचे नेटके आयोजन लक्षवेधी ठरत आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या संघांनीही मैदानात पूर्ण ताकदीनिशी उतरत स्पर्धेतील चुरस वाढवली आहे. त्यात यजमान पालघरने कुमार गटात सातारा आणि त्यानंतर हिंगोलीचा फडशा पाडत आपली ताकद दाखवून दिली. कुमारी गटातही जळगावचे आव्हान मोडून काढत पालघरने बाद फेरीत प्रवेश केला.

कुमार गटातील सर्वाधिक लक्षवेधी ठरलेल्या ‘अ’ गटात ठाणे शहराने दोन विजयांची नोंद करत सर्वप्रथम बाद फेरी गाठली. मात्र या गटातील खरी खळबळ उडवली ती मुंबई उपनगरने. मुंबई शहरविरुद्धच्या लढतीत उपनगरच्या खेळाडूंनी आक्रमण आणि बचावाचा सुरेख मेळ साधत 43-24 असा एकतर्फी विजय मिळवला. या विजयामुळे उपनगरने बाद फेरीच्या दिशेने जोरदार पाऊल टाकले असून गटातील पुढील लढतीनंतर दुसऱ्या संघाचे चित्र स्पष्ट होणार आहे.

अहिल्यानगरच्या कुमार संघानेही प्रतिस्पर्ध्यांना कोणतीही संधी न देता नाशिकनंतर धाराशीवचा 54-19 असा धुव्वा उडवला. ‘क’ गटात पुणे आणि जालना यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले. पुण्याने सिंधुदुर्गला 60-16 असे लोळवले, तर जालनाने नंदुरबारवर 38-28 अशी मात करत सलग दुसऱ्या विजयासह बाद फेरीतील प्रवेश निश्चित केला.

कुमार गटात मुंबई बाद

कुमार गटात मुंबई शहरला मुंबई उपनगरपाठोपाठ ठाण्याकडूनही पराभवाचा धक्का सहन करावा लागला आणि त्यांचे आव्हान साखळीतच संपुष्टात आले. ठाण्याने अत्यंत अटीतटीच्या लढतीत मुंबईचा 34-30 असा पराभव केला आणि अ गटात अव्वल स्थान पटकावले. या गटात उपनगर दुसरा आला. मात्र कुमारी गटात मुंबईने 2 विजयासह बाद फेरी गाठली.  त्यामुळे आता मुंबईच्या आशा या कुमारी गटावरच असणार आहेत.