
संपूर्ण महाराष्ट्रातील भीषण कोरडय़ा दुष्काळामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. राज्यात अन्नधान्य, कडधान्य व तेलबियांचा भीषण तुटवडा निर्माण होईल. त्यामुळे तातडीने दुष्काळ निवारण आराखडा करावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
महाराष्ट्रात पावसाच्या अभावामुळे खरीप हंगामातील ज्वारी, बाजरी, तांदूळ आणि मका यांच्या उत्पादनात 55 ते 60 टक्के घट झाली आहे. सोयाबीन आणि भुईमुगाचे उत्पादन सुमारे 65 टक्क्यांनी घसरले आहे. पावसाअभावी कोकण आणि पूर्व
विदर्भातील सुमारे आठ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरील भातशेती बाधित झाली आहे. तूर, मूग आणि उडदाच्या उत्पादनात 65 टक्क्यांपेक्षा मोठी घट आहे. राज्यातील विहिरी कोरडय़ा पडल्या आहेत. तलावांमध्ये पाणी नसल्याने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणेही कठीण झाल्याने शेतीला पाणी मिळणे अशक्य झाले आहे. या बिकट परिस्थितीमुळे यंदा रब्बी हंगामातील गहू, हरभरा व पालेभाज्यांचे पेरणी क्षेत्र 70 टक्क्यांनी खाली येण्याचा अंदाज आहे. उसाचे उत्पादन सुमारे 35 टक्क्यांनी घटण्याची शक्यता असल्याने साखर कारखाने व साखरेच्या उपलब्धतेवर विपरीत परिणाम होणार असल्याचेही अनिल देशमुख यांनी पत्रात नमूद केले आहे.
महाराष्ट्राला अन्नधान्याच्या संभाव्य संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकारने युद्धपातळीवर सर्वसमावेशक दुष्काळ निवारण आराखडा तयार करण्याची मागणी त्यांनी केली आहे.




























































