राष्ट्रपतींनी मतचोरीचा इन्कार केला नाही, पुरावे मागितले! ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घेण्याची इंडिया आघाडीची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशाचे भ्रष्ट मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घेण्याची मागणी आज लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीच्या शिष्टमंडळाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे केली. या भेटीत विरोधी पक्षांनी मतचोरी आणि निवडणूक चोरीवर बोट ठेवले असता त्याचा राष्ट्रपतींनी इन्कार केला नाही. त्याबाबत पुरावे मागितले, असे राहुल यांनी सांगितले.

ज्ञानेश कुमार यांना हटवण्याच्या मागणीसाठी विरोधक प्रचंड आक्रमक झाले आहेत. आज सलग तिसऱ्या दिवशी विरोधी पक्षाचे खासदार एकजुटीने उतरले. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये सुमारे 30 मिनिटे बैठक झाल्यानंतर खासदारांनी संसदेपासून राष्ट्रपती भवनापर्यंत मार्च काढला. त्यानंतर दहा खासदारांचे शिष्टमंडळ राष्ट्रपतींना भेटले. त्यात राहुल गांधी यांच्यासह तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, जम्मू आणि कश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, मनोज झा यांच्यासह अन्य घटक पक्षांच्या खासदारांचा समावेश होता.

देशात ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणीही राष्ट्रपतींकडे करण्यात आल्याचे यावेळी खरगे यांनी सांगितले. तर राष्ट्रपती या संविधान आणि लोकशाहीच्या रक्षक असून, त्यांनी आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. या गंभीर विषयात त्या योग्य ती कारवाई करतील, अशी अपेक्षा असल्याचे ममता बॅनर्जी यांनी सांगितले.

पुरावे देणार

राष्ट्रपतींना आम्ही आज मतचोरी आणि निवडणूक चोरीबद्दल सांगितले तेव्हा त्यांनी त्याचा इन्कार केला नाही. उलट त्यांनी मतचोरीचे पुरावे आमच्याकडे मागितले. त्यानुसार आम्ही जे पुरावे गोळा केले आहेत ते आम्ही लवकरच त्यांच्यापुढे सादर करणार आहोत, असे राहुल गांधी यांनी भेटीनंतर माध्यमांना सांगितले. मतचोरी होत आहे हे संपूर्ण देशाला कळून चुकले आहे. नरेंद्र मोदी या मतचोरीचे ‘आर्किटेक्ट’ आहेत, तर अमित शहा आणि ज्ञानेश कुमार त्याची अंमलबजावणी करतात असे नमूद करताना, आमच्या आरोपांवर विचार करून कारवाईचे आश्वासन राष्ट्रपतींनी दिल्याचे राहुल यांनी सांगितले.

शिवसेना ठाम पाठीशी

इंडिया आघाडीने लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी सुरू केलेल्या या ऐतिहासिक लढय़ात शिवसेना भक्कमपणे सोबत असल्याचे पत्र शिवसेना संसदीय पक्षाच्या वतीने खरगे यांना पाठवण्यात आले. पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे शिवसेनेचे खासदार शिष्टमंडळात सहभागी नव्हते. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते अरविंद सावंत यांनी खरगे यांना हे पत्र लिहिले.

चार मागण्या

ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घ्या. मुख्य निवडणूक आयुक्तांना आजन्म कायदेशीर संरक्षण देणारा कायदा रद्द करा.

एसआयआर रद्द करून मतदार यादीतून कापलेली 13 कोटी 30 लाख मतदारांची नावे पुन्हा समाविष्ट करा.

ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर मतदान घ्या.

गेल्या दोन वर्षांत जिथे जिथे मतचोरी झाली त्या सगळ्या विधानसभा निवडणुका रद्द करा.