
उत्सवात, लग्न समारंभात, मैदानात व सार्वजनिक ठिकाणी वापर होणाऱ्या अति तीव्र प्रकाशाच्या नियॉन लाईटचा वापर मुंबई, ठाणे व आसपासच्या शहरात 11 नंतर करण्यास पूर्णपणे मनाई करा, असे स्पष्ट आदेश उच्च न्यायालयाने शुक्रवारी राज्य शासनाला दिले. याबाबतचे सविस्तर निर्देश 1998 मध्ये देण्यात आले आहेत. त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करा, असेही न्यायालयाने बजावले आहे.
अति तीव्र लाईटमुळे मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. प्राणी व झाडांसाठीदेखील या लाईटस् धोकादायक आहेत, असा दावा करणारी याचिका निलेश देसाई यांनी अॅड. रौनिता भट्टाचार्य यांच्यामार्फत दाखल केली आहे. यावर मुख्य न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी व न्या. अद्वैत सेठना यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.
‘नो लाईट झोन’ जाहीर करा
ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी काही भाग हे ‘शांतता क्षेत्र’ म्हणून घोषित करण्यात आले आहेत. याप्रमाणे ‘नो लाईट झोन’ही जाहीर करण्यात यावा. अशा भागात अति तीव्र प्रकाशाच्या लाईटच्या वापरास पूर्णपणे बंदी असावी, अशीही मागणी याचिकेत करण्यात आली आहे.
कायदाच नाही
मोठय़ा प्रकाशाच्या लाईटच्या अति वापरामुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी कायदाच अस्तित्वात नाही. तेव्हा तीव्र लाईटमुळे होणारे प्रदूषण थांबवण्यासाठी ठोस नियमावली असावी, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.

























































