महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना व्हीव्हीआयपींच्या अलिशान गाड्यांसाठी साडे बारा कोटींची उधळण; 44 महागड्या मोटारींची खरेदी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत होरपळत आहे. दुष्काळाचा सामना करण्यासाठी राज्याकडे निधीची चणचण असल्याने राज्याने केंद्र सरकारकडे मदतीचा हात पसरला आहे; मात्र दुसरीकडे राज्य सरकारने अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी 12 कोटी 68 लाख रुपये किमतीची 44 महागडी वाहने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये चार कोटी रुपयांच्या एका बुलेटप्रूफ टोयोटा लँड क्रूझरचा समावेश आहे.

राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्री मंत्री, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, न्यायमूर्ती आणि अन्य अतिमहत्त्वाच्या व्यक्ती महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आल्यानंतर त्यांच्या वाहन व्यवस्थेसाठी शासकीय परिवहन सेवा, मुंबई आणि जिल्हाधिकारी कार्यालयांच्या राजशिष्टाचार शाखेमार्फत वाहने उपलब्ध करून दिली जातात. अशा अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची वाहनांअभावी गैरसोय निर्माण होऊ नये यासाठी जुनी तसेच नादुरुस्त वाहने बदलून त्याऐवजी नव्या वाहनांच्या खरेदीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.

अतिमहत्त्वाच्या व्यक्तीसाठी करण्यात येणाऱ्या या खरेदीमध्ये महागडय़ा 32 टोयोटा इनोव्हा क्रिस्टा, दोन टोयोटा फॉर्च्युनर, एक बुलेटप्रूफ टोयोटा लँड क्रूझर, सात मारुती एर्टिगा, एक टोइंग वाहन आणि एक अरबानिया बस अशा एकूण 44 वाहनांचा समावेश आहे. त्यासाठी लागणाऱ्या  12 कोटी 68 लाख 64 हजार 342 रुपयांच्या अंदाजित खर्चाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. राजशिष्टाचार विभागाने शुक्रवारी यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला.

जीईएम पोर्टलवरून खरेदी

ही 44 वाहने गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस पोर्टलवरून एकल स्त्रोत पद्धतीने खरेदी करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. निधी उपलब्धतेच्या मर्यादेत वाहन खरेदी करण्याचे, शासकीय नियमांचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.

वाहन प्रकार        एका वाहनाची अंदाजित किंमत

टोयोटा इनोव्हा क्रिस्टा     20 लाख 71 हजार 453 रुपये

टोयोटा फॉर्च्युनर 30 लाख रुपये

बुलेटप्रूफ टोयोटा लँड क्रूझर           4 कोटी 7 लाख 68 हजार रुपये

मारुती एर्टिगा     11 लाख 59 हजार 100 रुपये

अरबानिया बस   31 लाख रुपये