
एव्हिएशन टर्बाइन फ्युएल म्हणजेच जेट इंधन महाग झाल्यामुळे विमान कंपन्यांनी इंधन अधिभार वाढवल्याने विमान प्रवास महाग झाला आहे. सर्वात आधी इंडिगो कंपनीने इंधन अधिभार वाढवल्यानंतर आता एअर इंडियानेही आपल्या इंधन अधिभारात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे एअर इंडियाने आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या प्रवाशाला 17 हजार रुपये जास्तीचे मोजावे लागणार आहेत.
एअर इंडियाच्या विमानामधून प्रवास करणे आजपासून महाग झाले आहे. एअरलाइननेही देशांतर्गत उड्डाणांवर 1,200 रुपयांपर्यंत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर 17,800 रुपयांपर्यंत अतिरिक्त इंधन शुल्क आकारण्याची घोषणा केली आहे. एअर इंडियाने सात महिन्यांत तिसऱ्यांदा इंधन अधिभार वाढवला आहे. यापूर्वी एअरलाइनने यावर्षी 10 मार्चला आणि त्यानंतर 7 एप्रिलला भाडेवाढ केली होती. विमान इंधनाच्या किमती वाढल्यामुळे विमानसेवा चालवण्याचा खर्च वाढला आहे.
जेट इंधन 16 रुपयांनी महागले
1 ऑक्टोबरपासून जेट इंधन 16 रुपयांनी महाग झाले आहे. देशांतर्गत विमान कंपन्यांसाठी किंमत 121 रुपयांवरून आता 137 रुपये झाली आहे, तर तीन महिन्यांत 27 रुपयांनी महाग झाले आहे. ऑगस्टमध्ये 5 रुपये लिटर, सप्टेंबरमध्ये 6.28 रुपये लिटर आणि ऑक्टोबरमध्ये 16 रुपये लिटर इंधन महाग झाले आहे.


























































