मुंबईत उष्णतेच्या लाटेची धग; कुलाब्यापासून उपनगरांपर्यंत 38 अंशांचे चटके, ठाणे, रायगडसह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर मोठी तापमानवाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्रातून मान्सूनने पूर्णपणे माघार घेताच उष्णतेचा तडाखा वाढला आहे. शुक्रवारी मुंबई, ठाणे, रायगडसह संपूर्ण किनारपट्टी भागात उष्णतेची लाट धडकली आणि नागरिकांना तीव्र चटके व प्रचंड उकाड्याने हैराण केले. मुंबई शहरात कुलाब्यापासून ते पूर्व व पश्चिम उपनगरांपर्यंत ३८ अंश तापमानाचे चटके बसले. सांताक्रूझ आणि कुलाबा या दोन्ही हवामान केंद्रांवर सरासरीपेक्षा पाच अंशांची मोठी तापमानवाढ झाली. त्यामुळे दुपारी घराबाहेर पडलेल्या मुंबईकर आणि ठाणेकरांची रणरणत्या उन्हात दमछाक झाली.

यंदा मान्सून सरासरी तारखेच्या दोन दिवस आधीच परतीच्या वाटेला लागला. त्यानंतर हळूहळू उष्णता वाढीस लागला होती. गेले काही दिवस ३५ ते ३६ अंशांच्या आसपास कमाल तापमानाची नोंद होत होती. त्यात शुक्रवारी अचानक मोठी वाढ झाली. पाऱ्याने सरासरीपेक्षा पाच अंशांची मोठी उडी घेतल्यामुळे कमाल तापमान थेट ३८ अंशांच्या उच्चांकी पातळीवर झेपावले.

१२ ऑक्टोबरपर्यंत चटके

हवामानशास्त्र विभागाने मुंबई महानगर क्षेत्र तसेच महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीच्या भागात १२ ऑक्टोबरपर्यंत उष्णतेच्या लाटेची धग कायम राहणार असल्याचा इशारा दिला आहे. दक्षिण कोकणातील जिल्ह्यांमध्ये काही भागांत उष्णतेची लाट असेल, तर उत्तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहील, असे हवामान विभागाने म्हटले आहे. त्याच पार्श्वभूमीवर नागरिकांना खबरदारी घेण्याचा इशारा देण्यात आला आहे.