मुंबईकरांनो, सावधान.. फटाके उडवाल तर थेट जेलमध्ये जाल; दसरा आणि दिवाळीतही फटाके फोडण्यास बंदी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सार्वजनिक ठिकाणे किंवा रस्त्यांवर फटाके उडवाल तर थेट जेलमध्ये जाल असा इशारा मुंबई पोलिसांनी दिला आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणांवर फटाके फोडणे, आतिषबाजी, रॉकेट उडविण्यास बंदी घातली असून लेझर लाइट, उच्च तीव्रतेच्या लुमेन लाइट्स आणि बीम्सच्या वापरावरही बंदी घातली. तसा आदेश पोलिसांनी जारी केला आहे.

फटाक्यांमुळे होणारे वायू आणि ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई हायकोर्टाने रस्त्यांसह सार्वजनिक ठिकाणे व रस्त्यांवर फटाके फोडण्यास पूर्णतः बंदीचे निर्देश दिले होते. कोर्टाने याबाबत आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देशही संबंधित प्राधिकरणांना दिले. या पार्श्वभूमीवर पोलिस उपायुक्त (अभियान) तथा कार्यकारी दंडाधिकारी अकबर पठाण यांनी हा आदेश जारी केला आहे.

आर्थिक दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा

पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत 6 ऑक्टोबर ते 4 डिसेंबरला मध्यरात्री 12 वाजेपर्यंत हा आदेश लागू राहणार आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम, पर्यावरण (संरक्षण) अधिनियम कायद्यांनुसार कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. त्यानुसार पाच हजारांपासून लाखो रुपयांचा दंड आणि 2-3 वर्षे तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे.