जालन्यात अवैध शस्त्रसाठा जप्त; पिस्तुल विक्री करणारा म्होरक्या जेरबंद, चौघांचा शोध सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जालना शहरात अवैध शस्त्रांची विक्री करणार्‍या टोळीविरुद्ध कदीम जालना पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. जालन्यातील विशाल कॉर्नर परिसरातून एका संशयिताला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या कारवाईत सहा गावठी बनावटीचे पिस्तुल, दोन ऑटोमॅटिक पिस्तुल, एक धारदार खंजर आणि जिवंत काडतुसे असा एकूण 6 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणातील मुख्य आरोपी भिमा भाऊराव वाघमारे (रा. सोलगव्हाण, ता. जि. जालना) याला पोलिसांनी अटक केली असून, अन्य चार पाहिजे आरोपींचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 7 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7.20 वाजण्याच्या सुमारास कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, छत्रपती संभाजीनगर रोडवरील विशाल कॉर्नर परिसरात एक इसम अवैध शस्त्रे घेऊन उभा असून, तो गंभीर स्वरूपाचा गुन्हा करण्याच्या तयारीत आहे. या माहितीची वरिष्ठ अधिकार्‍यांना कल्पना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक तातडीने रवाना करण्यात आले.

पोलिसांनी विशाल कॉर्नर परिसरात सापळा रचून भवानीनगरकडे जाणार्‍या रस्त्यावर रात्री 8.15 वाजण्याच्या सुमारास संशयिताला ताब्यात घेतले. त्याच्याकडून दोन पिस्तुल, मॅगझीनमध्ये असलेली जिवंत काडतुसे आणि आयफोन कंपनीचा मोबाईल जप्त करण्यात आला. त्यानंतर आरोपीची चौकशी केली असता, तो जालना शहर व परिसरात अवैध शस्त्रांची विक्री करणारा मुख्य आरोपी असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

आरोपीकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी इतर संशयितांच्या घरांची झडती घेतली. यात 6 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 572/2026 अन्वये शस्त्र अधिनियमातील कलम 3/25, 4/25 तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम 37 (1) (3) चा भंग केल्याप्रकरणी कलम 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील अन्य चार पाहिजे आरोपींचा शोध सुरू असून, अवैध शस्त्रांची खरेदी-विक्री, पुरवठ्याचे स्रोत आणि संभाव्य गुन्ह्यांशी या शस्त्रांचा संबंध आहे का, याचा तपास पोलीस करीत आहेत.