
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या इंडिया आघाडीच्या खासदारांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेण्यासाठी वेळ मिळाला आहे. आज रात्री 8 वाजता इंडिया आघाडीचे 10 खासदार राष्ट्रपतींची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी या निवेदनाद्वारे केली जाणार आहे.
विरोधी पक्षांकडून गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रपतींच्या भेटीसाठी वेळ मागितला जात होता. अखेर राष्ट्रपतींकडून 10 नेत्यांच्या शिष्टमंडळाला भेटण्याची परवानगी मिळाली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणाऱ्या शिष्टमंडळात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बिहारचे नेते तेजस्वी यादव यांच्यासह डाव्या पक्षांचे नेते सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात काँग्रेससह विविध विरोधी पक्ष गेल्या तीन दिवसांपासून दिल्लीमध्ये आंदोलन करत आहेत. शुक्रवारी या आंदोलनाचा चौथा दिवस आहे. निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करत विरोधकांनी ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्याची मागणी केली आहे.

























































