
शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज महाराष्ट्रातील एसआयआरवर सादरीकरण करत निवडणूक आयोगाचा गोलमाल कारभार उघड केला आहे. निवडणूक आयोगाने एसआयआरसाठी कुठली मतदार यादी ग्राह्य धरली आहे? असा सवाल उपस्थित करत आदित्य ठाकरे यांनी मुख्य निवडणूक आयुक्त गद्दार ग्यानेश मस्ट गो…हा नारा दिला आहे.
देशात सगळीकडे चर्चा सुरू आहे ती एकच आहे. एसआयआरवर आमचा आधी विश्वास होता. आम्हाला वाटत होतं की महाराष्ट्रातलं जो एसआयआर आहे जो गरजेचा आहे. त्याच अनुषंगाने आम्ही सगळीकडे आमचे बीएलये देण्याचा प्रयत्न केला. मुंबईत जवळपास १०० टक्की बीएलए झाले. अनेक जिल्ह्यांमध्ये १०० टक्के बीएलये झाले. आणि बीएलएंचं काम होतं घरोघरी जाऊन बीएलओ सोबत राहून फॉर्म भरण्यात मदत करणं. आणि खरी यादी आणणं. आपल्याला आठवत असेल तर २०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी वरळी मतदारसंघात साडेचोवीस हजार बोगस मतदार सापडले. त्यानंतर मुंबईत १ कोटी ३१ लाख मतदारांमधून जवळपास ३० लाख मतदार हे आम्हाला कुठेना कुठे त्यांच्यावर संशय होता. कारण कोण डुप्लीकेट, त्रिप्लीकेट, कोणाची पाच वेळा नावं आली, कोण अशा ठिकाणी नावं आहेत तिथे घरचं नाही. १० बाय १० खोलीत हजारो नावं पाहत होतो. आणि हे सगळं केल्यानंतर आम्ही मुंबई महापालिकेच्या अभ्यासाला लागलो तेव्हा जवळपास १७ लाख लोकांची यादी ही इकडच्या निवडणूक आयोगाने दिली होती. आणि निवडणूक आयुक्त आम्हाला बोलले होते जेव्हा एसआयआर होईल तेव्हा क्लीन होईल. एसआयआर पूर्ण झालेलं आहे. तारिख नेमकी कुठली? हा एक गडबड आणि गोंधळ आहे. फॉर्म ६ आता कुठल्या प्रकारे घेणार हे सगळं सुप्रीम कोर्टात चाललं आहे. पण जो ड्राफ्ट रोल आला त्याचा आम्ही थोडासा अभ्यास केला. त्याच्या आधी आणि नंतरची परिस्थिती दाखवतो, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी सादरीकरण केले.
गोलमाल ग्यानूचा पहिला गोलमाल
२६ मे २०२६ ला जे आम्हाला पत्रक आलं त्याच्यात महाराष्ट्रात ९ कोटी ८६ लाख ४४ हजार ४१३ आणि ३१ ऑगस्ट २०२६ जे आलं त्यात ९ कोटी ७८ लाख ५४ हजार ०४९ मतदार दाखवले. मग हा जो ७ लाख ९० हजार ३६४ हा नेमका मतदारांचा आकडा गेला कुठे? २६ मे आणि ३१ ऑगस्टला जे मतदारांचे आकडे दिलेले आहेत हे अद्याप स्पष्ट नाही की हे एसआयआर झालेले आकडे आहेत? यादी क्लीन झालेले आकडे आहेत? तर हे ७ लाख ९० हजार ३६४ मतदार नेमके गेले कुठे? हे डुप्लिकेट होते? हे घोस्ट व्होटर गेले कुठे? हा एक मोठा प्रश्न आहे. हा पहिला प्रश्न आम्हाला गोलमान ग्यानूंना विचारायचा आहे की नेमके हे मतदार गेले कुठे? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.
संपूर्ण महाराष्ट्रात हा गोलमाल झालेला आहे. तसंच मुंबईमध्ये जवळपास ५ लाख मतदार आणि अजूनही आमचा शोध चालू आहे. प्रथामिक आकडा आम्हाला ५ लाखाचा मिळालेला आहे. आमचा अंदाज आहे जवळपास १० लाखापर्यंत आकडा जाऊ शकतो. पाच लाख मतदार असे आहेत ज्यांचं नाव निवडणुकीच्या यादीत होतं. म्हणजे लोकसभेत होतं, विधानसभेत होतं, मुंबई महापालिकेच्या यादी होतं. आणि आता एसआयआर झाल्यानंतर ना ड्राफ्ट रोलमध्ये आहे ना एएसडीडीमध्ये आहे. म्हणजे तुम्ही विचार करा, हे जवळपास पाच साडेपाच लाख मतदार जे आम्हाला सापडलेले आहेत ते कुठल्या तरी यादीत पाहिजेत. एकतर ते पात्र यादीत म्हणजे ड्राफ्ट रोलमध्ये पाहिजेत. आणि ड्राफ्ट रोलमध्ये नसेल तर एएसडीडी म्हणजे नॉट फाउंड, नॉट ट्रेसेबल, मार्क झालेले नाहीत, डेड आहेत, कुठेतरी पाहिजेत? पण हे पाच लाख मतदार गेले कुठे? हे गायब झाले कुठे? कुठल्यातरी यादीत आले पाहिजेत. पण याचं देखील निवडणूक आयोगाकडे अजून एकही उत्तर नाहीये, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
भिवंडी मतदारसंघात २०२४ ला ३ लाख ७३ हजार ६५९ मतदार होते. एकूण मतदार किती होते? १ लाख ९१ हजार ६९१ होते. आणि आता एसआयआरमध्ये १ लाख ९१ हजार ४४६ इतके मतदार आहेत. म्हणजे एसआयआरच्या यादीत २४५ मतदार कमी झाले. मग हे मतदार गेले कुठे? हे घोस्ट व्होटर होते? हे दुसऱ्या राज्यातून आले होते? की हे दुसऱ्या राज्यात गेलेत? की दुसऱ्या देशात गेलेत? नेमके हे आले कुठून आणि गेले कुठे? कुठल्या यादीत आहेत? एकतर एएसडीडीमध्ये किंवा मग ड्राफ्ट रोमध्ये पाहिजेत. पण ही एवढी तफावत झाली कशी? हा एक मोठा प्रश्न आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
माहीम विधानसभा मतदारसंघात एका बुथवर ९०० मतदार आहेत. त्या ९०० मतदारांचं जवळपास सगळ्यांचच २००२ च्या एसआयआरच्या रोलमध्ये नाव आहे. तेवढचं नाही तर २००२ ते आतापर्यंतच्या प्रत्येक निवडणुकीत त्यांनी मतदान केलेलं आहे. आता एसआयआर २०२६ च्या ड्राफ्ट रोलमध्ये त्यांची नावं आली आहेत. म्हणजे आपण त्यांना पात्र मतदार समजू. पण हे सगळं केल्यानंतरही ह्यांचं निवडणूक आयोगाच्या सॉफ्टवेअरमध्ये मॅपिंग होत नाहीये. त्यामुळे त्यांना आता नोटीसा गेल्या आहेत की तुम्ही मतदार आहात आणि देशाचे नागरिक आहात हे सिद्ध करा? म्हणजे स्वतःच्या ड्राफ्ट रोलमध्ये नाव येऊन देखील यांना आता नोटीसा गेल्या आहेत. असं जर माहीमधील एका बुथमध्ये जर एवढी ९०० नावं असतील तर विचार करा संपूर्ण महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशात किती नावं आहेत? असेही अनेक मतदार आहेत ज्यांच्या घरी ना बीएलओ गेलेत, ना यांचं एन्युमरेशन झालंय. पण यांना थेट अनमॅप किंवा अॅबसेंट म्हणून दाखवण्यात आलं आहे. हे मतदार जाणार कुठे? आणि ही यंत्रणा चालली कशी? कारण मग बीएलओ यांच्या घरीच गेले नसतील तर कुठल्या बीएलओने काम केलंय? कुठेपर्यंत काम केलं आहे? याचा देखील आढावा असायला पाहिजे, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली.
एसआयआर कशासाठी आपण केला होता? तर ज्या काही त्रुटी आहे त्याच्यातल्या त्या निघून जाव्यात. ज्या काही आपल्याला वाटतं तफावती आहे त्या निघून जाव्यात. ज्या काही चुका आहेत त्या करेक्ट व्हाव्यात. पण अनेक आतापर्यंत आम्हाला कितीतरी मतदार आम्हाला असे सापडले आहेत ज्यांना डेड दाखवलेलं पण ते खरं जीवंत आहेत. ज्यांना कुठेतरी स्थलांतरीत झाल्याचं दाखवलेलं आहे पण ते अजून तिथेच आहेत. काही काही अजूनही घोळ तसेच आहेत की एक इपिक नंबर चार लोकांना एकच दिलेला आहे. काही काही लोकांच्या अजूनही चार मतदार आयडी आहेत. कुठलाही घोळ अजून यातून निघालेला नाही, हे आदित्य ठाकरे यांनी निदर्शनास आणून दिले.
निवडणूक आयोगाने २०२४ विधानसभा निवडणुकीसाठी पात्र मतदारांची संख्या ९ कोटी ७१ लाख ४१ हजार २८९ ही दिली होती. त्यानंतर २६ मे २०२६ रोजी जाहीर केलेल्या पत्रकातील मतदारांची संख्या ९ कोटी ८६ लाख ४४ हजार ४१३ इतकी होती. ३१ ऑगस्ट २०२६ रोजी जाहीर केलेल्या पत्रकातील मतदारांची संख्या ही ९ कोटी ७८ लाख, ५४ हजार ०४९ इतकी होती. या तिन्ही ठिकाणी मतदारांचा आकडा वेगवेगळा आहे. हे तिन्ही आकडे महाराष्ट्राचे पात्र मतदार म्हणून निवडणूक आयोगाने आम्हाला दिलेले आहेत. साधारणपणे तिन्ही आकड्यांत लाखोंचं अंतर आहे. तीन वेगळ्या वेगळ्या दिवशी दिलेले आहेत. आणि नेमकं मग निवडणूक आयोगाने एसआयआरसाठी कुठली मतदार यादी ग्राह्य धरली आहे? या तीन आकडेवारीवरून पकडलेला आहे? मुंबई महापालिकेला जो रोल मिळालेला आहे त्याच्यातून पकडलेला आहे? की मग तुम्ही जुलै २०२५ ची यादी ग्राह्य धरली आहे? की नोव्हेंबर २०२४ ची यादी पकडलेली आहे? की मे २०२४ ची यादी ग्राह्य धरली आहे. नेमकी कोणती यादी घेतली आहे? पण निवडणूक आयोगाने कुठली यादी ग्राह्य धरली आहे? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.
आपण पाहतो देशभरात जी आंदोलनं सुरू आहेत, राजकीय असतील अराजकीय असतील ही या देशाच्या भवितव्याबद्दल आहेत, तुमच्या मतदानाच्या अधिकाराबद्दल आहे. तुमच्या आवाजाबद्दल आहे. म्हणूनच सगळे म्हणताहेत की गद्दार ग्यानेश मस्ट गो, असा नारा आदित्य ठाकरे यांनी दिला आहे.

























































