बुरोंडी बंदर समस्यांच्या गर्तेत; राजकीय इच्छाशक्तीच्या अनास्थेचे उत्तम उदाहरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्वच्छ, स्वस्त आणि ताजी मासळी मिळण्याचे ठिकाण म्हणून बुरोंडी बंदराची ख्याती आहे. मात्र हे ख्याती असलेले बुरोंडी बंदर राजकीय इच्छाशक्तीच्या अनास्थेमुळे एक ना अनेक समस्यांच्या गर्तेत अडकून पडले आहे. या बंदरात मासेमारी करणाऱ्या साधारणपणे 135 च्या आसपास लहान मोठ्या होड्या आहेत.

या बंदरात स्वातंत्र्याची पंचाहत्तरी उलटून गेली तरी बंदरात अजूनही जेट्टीची व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे समुद्रातून पागून आणलेल्या मासळीच्या होड्या या किनाऱ्याला लावताना कमरेभर पाण्यातून मासळीच्या टोपल्या आणताना मासेमारांची चांगलीच दमछाक होत असते. बंदरात जेट्टीची जशी महत्वाची समस्या निकाली काढण्यात राजकीय अनास्था आहे. तसे बुरोंडीत मासळी विक्रीकरीता येथे मच्छीमार्केटची समस्या कित्येक वर्षे आ वासून उभी आहे.

मासळी विक्रीकरीता इमारत नसल्याने मासळी खरेदीसाठी बुरोंडीत दूर दूरहून आलेल्यांना एकतर सकाळीच बंदरावर येवून मासळी विकत घ्यावी लागते. तसेच मासळी विक्रेत्या महिलांना भर उन्हात बसूनच उघड्यावर बसून मासळीची विक्री करावी लागते. यामध्ये उन्हाच्या कडाक्याने मासळी खराब होण्याचे प्रमाण अधिक असते. तसेच मासळी मार्केटची ईमारत नसल्याने मासळी विक्रेत्या महिलांना प्रसाधनगृहाची सोय नाही. त्यामुळे महिला विक्रेत्यांना लघुशंका करावयाची झाल्यास त्यांची मोठीच गैरसोय होत आहे. शिवाय पिण्याच्या पाण्याची सोय सुद्धा नाही. अशा प्रकारे एक ना अनेक समस्या या राजकीय इच्छाशक्तीच्या अनास्थामुळेच मागे पडून बुरोंडी बंदराचा विकास खुंटला आहे. अजून किती काळ वाट पाहिल्यावर समस्यांची पूर्तता होईल याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.