
नवरात्रीच्या उत्सवासाठी मुंबईतील बाजारपेठा सजल्या आहेत. नवरात्रौत्सवातील दांडिया नृत्यासाठी लागणारे घागरा, चुनरी, टिपऱ्यांसह अन्य आवश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी आतापासूनच दुकानात गर्दी होत आहे.
मुंबईतील भुलेश्वरमध्ये विविध दुकाने वेगवेगळ्या साहित्यांनी सजली आहेत. मुलांच्या ड्रेसमध्ये पारंपरिक राजस्थानी ड्रेसची चलती आहे. यामध्ये पुर्ता, धोती व फेटा असा सेट खास गरब्यासाठी आला आहे. पिवळ्या रंगाच्या शेड्स जास्त खरेदी केल्या जात असून मुलींच्या ज्वेलरीत कमरपट्टा, बिंदी, नथनी, बांगडय़ा, पायातील कडे आदी दागिने दाखल झाले आहेत. दुकानात रंगीबेरंगी बांगडय़ाही आल्या आहेत. मुलींच्या ड्रेसमध्ये घागरा-चोलीला मागणी आहेत. यामध्ये बांधणी, कॉटन बेसवर आबलावर्प, सुंदर मिरर वर्क, डिजिटल प्रिंट असलेली चनिया चोली, नववारी साडी, अँब्रोयडरी लेहंगाला विशेष मागणी आहे. नवरात्रीसाठी लागणारे कलश आणि पूजेच्या साहित्यासोबत उपवासाचे पदार्थ बाजारात दाखल झाले आहे.


























































