
मुंबईला पाणी पुरवठा करणाऱया जलाशयातील पाण्याची पातळी सातत्याने कमी होत असून आगामी काळात संभाव्य पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईकरांना पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेने आतापासूनच प्रभावी नियोजन करणे आवश्यक आहे. पाण्याची गळती आणि अनधिपृत वापर रोखणे, बांधकामांसाठी होणाऱया पाण्याच्या वापरावर नियंत्रण ठेवणे, बंद पडलेल्या विहिरींचे पुनरुज्जीवन करणे तसेच उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे यावर प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी पालिकेतील विरोधी पक्षनेत्या शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर यांनी आज केली.
नुकतीच तलावांची पाहणी केली असता मोठय़ा प्रमाणावर बाष्पीभवन होत असल्याचे निदर्शनास आले. पावसाचे प्रमाण कमी असल्याने आणि तलावांतील पाण्याची पातळी घटत असल्याने भविष्यात पाणीपुरवठय़ाचे नियोजन अधिक काळजीपूर्वक करणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.





























































