
वेस्ट इंडीजचा कर्णधार शाई होपचा टीम इंडियावर दुसऱ्या टी-20 सामन्यात कोप झाल्याचे पाहायला मिळाले. होपने आपला फॉर्म कायम ठेवत चौथ्या सामन्यातले तिसरे शतक झळकवले आणि वेस्ट इंडीजला विजय मिळवून दिला. संजू सॅमसनच्या वादळी फटेकबाजीच्या जोरावर टीम इंडियाने 249 धावा रचल्या होत्या; पण होप आणि त्याला शेरफन रदरफोर्डने दिलेल्या सुयोग्य साथीच्या जोरावर वेस्ट इंडिजने टीम इंडियावर 6 विकेट्स राखून विजय मिळवला आणि मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. आता तिसरा टी-20 सामना 11 ऑक्टोबरला खेळवण्यात येणार आहे. होपने यावेळी 45 चेंडूंत 6 चौकार आणि 9 षटकारांच्या जोरावर नाबाद 102 धावा करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
टीम इंडियाच्या 250 धावांचा पाठलाग करताना मयांक यादवने पहिल्याच षटकात वेस्ट इंडिजची 2 बाद 5 अशी अवस्था केली होती. पण त्यानंतर होपने सामन्याची सर्व सूत्रे आपल्या हातात घेतली आणि हिंदुस्थानी गोलंदाजांवर जोरदार प्रहार केला. टीम इंडियाचा एकही गोलंदाज त्याला अडचणीत आणू शकला नाही. अर्धशतक पूर्ण झाल्यावर होप अधिक आक्रमक झाला. होपला यावेळी रदरफोर्डने दमदार साथ दिली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 120 धावांची भागीदारी रचली आणि वेस्ट इंडीजच्या बाजूने सामना झुकवला. रदरफोर्डने अर्धशतक झळकवले, पण त्याला शतक पूर्ण करता आले नाही. त्याने फक्त 37 चेंडूंत प्रत्येकी सात चौकार आणि षटकार लगावत 84 धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली. रदरफोर्ड बाद झाला तरी वेस्ट इंडीजच्या विजयाचा होप मात्र कायम होता. होपने षटकारासह आपले शतक पूर्ण करत संघाच्या विजयावरही शिक्कामोर्तब केले.
संजूने हिंदुस्थानच्या डावाची आक्रमक सुरुवात केली. वेस्ट इंडीजच्या गोलंदाजांवर संजू चौफेर हल्ला चढवत होता. 6 धावांवर असताना निकोलस पुरनने त्याचा झेल सोडला होता. या जीवदानाचा चांगलाच फायदा संजूने उचलला आणि त्यानंतर तो गोलंदाजांवर तुटून पडला. अभिषेक 20 धावा करून बाद झाला असला तरी संजू मात्र हिंदुस्थानची धावगती विमानाच्या स्पीडने वाढवत होता. सहाव्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर दमदार चौकार लगावत संजूने 21 चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतरच्या 20 चेंडूंमध्ये संजूने 42 धावांची भर घातली. संजू शतकही पूर्ण करेल, असे वाटत होते. पण जीवदान देणाऱ्या निकोलस पुरननेच त्याचा झेल पकडला आणि संजूने शतकाचे स्वप्न धुळीस मिळाले. संजूने 41 चेंडूंत 9 चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर 82 धावांची दणकेबाज खेळी साकारली आणि या खेळीसह त्याने आपले संघातील स्थान अधिक पक्के केले.
ईशान किशननेही 22 चेंडूंत 42 धावांची खेळी साकारली, तर शिवम दुबे हा फक्त 7 धावाच करून शकला. पण संजू बाद झाल्यावर कर्णधार श्रेयस अय्यरने तुफानी फटकेबाजी करत संघाची धावगती पुन्हा एकदा जेटच्या स्पीडने वाढवली. तिलक वर्मा हा त्याला सुयोग्य साथ देत होता. या दोघांनी प्रत्येकी तीन चौकार आणि तीन षटकार लगावले. श्रेयसने 18 चेंडूंत 40 धावा केल्या आणि अखेरच्या षटकात तो बाद झाला. पण तिलक मात्र 18 चेंडूंत 44 धावा करत नाबाद राहिला. तिलकने अखेरच्या षटकात तीन षटकार ठोकले आणि त्यामुळेच संघाने 249 धावांपर्यंत मजल मारली.





























































