
ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाचा सलामीवीर सॅम कॉन्स्टास आणि यष्टिरक्षक जोश फिलिप यांच्या अर्धशतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातही हिंदुस्थान ‘अ’ संघाचा 69 धावांनी पराभव करत तीन सामन्यांची मालिका खिशात घातली. पहिला सामना ऑस्ट्रेलियाने 125 धावांनी जिंकला होता. मालिकेतील अखेरचा सामना रविवारी खेळवला जाणार आहे.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीस आलेल्या ऑस्ट्रेलियाचा संघ 275 धावांवर तंबूत परतला. ऑस्ट्रेलियाची सुरुवात संयत होती. मिचेल ओवेन 13 चेंडूंत 25 धावा काढून झेलबाद झाला. त्यानंतर सॅम कॉन्स्टास आणि जोश फिलिप यांनी दुसऱ्या विकेटसाठी 101 धावांची शतकी भागीदारी केली. निशांत सिंधूने 58 धावांवर खेळणाऱ्या जोश फिलिपला झेलबाद करून ही जोडी फोडली. त्यानंतर सॅम कॉन्स्टासने 88 चेंडूंत 7 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 67 धावांचे योगदान दिले. कर्णधार नॅथन मॅकस्वीनी 32 धावा काढून धावबाद झाला, तर पाचव्या क्रमांकावर आलेल्या लचलान शॉने 25 धावा केल्या. हिंदुस्थानच्या अर्शद खानने 3, यश ठाकूरने 2, तर विप्रज निगम, निशांत सिंधू, सूर्यांश शेडगे आणि अनुकूल रॉय यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
‘रजत’ची एकाकी झुंज
ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 276 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हिंदुस्थान ‘अ’ संघाचा डाव 206 धावांवरच गडगडला. हिंदुस्थानकडून केवळ रजत पाटीदारने अर्धशतकी खेळी करत एकाकी लढा दिला. त्याने 81 चेंडूंचा सामना करताना 67 धावा केल्या. त्याच्याव्यतिरिक्त अनुपूल रॉय 34 धावांवर नाबाद राहिला. विप्रज निगमने 23, तर निशांत सिंधू आणि साई सुदर्शन यांनी प्रत्येकी 13 धावा केल्या. ऑस्ट्रेलिया ‘अ’कडून स्पेन्सर जॉन्सनने 3, तर रिले मेरेडिथ आणि तन्वीर संघा यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.



























































