सोलापुरात ऊसदराचे आंदोलन पेटणार; ऊसतोड बंद करून वाहतूक करणारी वाहने रोखली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चालू हंगामातील ऊसाचा दर जाहीर न करताच साखर कारखान्यांकडून ऊसतोड सुरू करण्यात आल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. माढा आणि पंढरपूर तालुक्यांत संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ऊस वाहतूक रोखून धरली. तसेच भीमानगर येथे बारामती ऍग्रो कारखान्याच्या कार्यालयाला टाळे ठोकून ऊसदर जाहीर करण्याची मागणी करण्यात आली.

एकीकडे ऊस उत्पादक शेतकरी उत्पादन खर्चाच्या वाढत्या ओझ्याखाली दबला असताना दुसरीकडे कारखानदारांनी ऊसाचा दर जाहीर न करताच ऊसतोड सुरू केल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. एकदा शेतातील ऊस कारखान्यात गेल्यानंतर कारखानदार ठरवतील तो दर स्वीकारण्याची वेळ शेतकऱ्यांवर येऊ नये, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना विश्वासात न घेता आणि ऊसाचा दर स्पष्ट न करता कारखाने सुरू करणे अन्यायकारक आहे. त्यामुळे उसाला योग्य दर जाहीर झाल्याशिवाय ऊसतोड आणि ऊस वाहतूक सुरू वरू देणार नाही, अशी भूमिका संघटनेने घेतली आहे. याच भूमिकेतून माढा-पंढरपूर तालुक्यांत ऊस वाहतूक करणारी वाहने रोखण्यात आली, तर भीमानगर येथे बारामती ऍग्रो कारखान्याच्या कार्यालयाला टाळे ठोकण्यात आले.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या घामाला योग्य दाम मिळावा, उत्पादन खर्चाची भरपाई होऊन शेतकऱ्यांच्या हातात चार पैसे शिल्लक राहावेत, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. कारखानदारांनी तातडीने ऊसदर जाहीर करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अन्यथा सोलापूर जिल्ह्यात ऊस दराचे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.