
हिंदुस्थानचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने त्याच्या तुफानी फटकेबाजीने क्रिकेट विश्वात दहशत निर्माण केली होती. सेहवागच्या मुलानेदेखील वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत विनू मंकड करंडक स्पर्धेत दिल्ली अंडर-19 संघासाठी वादळी खेळी साकारली आहे. सेहवागचा मुलगा आर्यवीरने चंदिगडविरुद्धच्या सामन्यात अवघ्या 173 धावा कुटत दिल्लीच्या गोलंदाजांना आपल्यापुढे लोटांगण घालायला भाग पाडले.
आर्यवीरकडे नुकतेच दिल्ली 19 वर्षांखालील संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले होते. पहिल्या सामन्यात त्याने कर्नाटकविरुद्ध 32 धावांची खेळी केली. पण शुक्रवारी त्याने आक्रमक खेळी करत मैदानात चौफेर फटकेबाजी केली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर कर्णधार आर्यवीरने अर्नव बग्गासोबत सलामीसाठी 98 धावांची भागीदारी केली. बग्गा 47 धावांवर बाद झाला. यानंतर दिल्लीने 81 धावांच्या अंतरात चार गडी गमावले, ज्यामुळे त्यांची धावसंख्या 4 बाद 179 अशी झाली. या बिकट परिस्थितीत आर्यवीरने पाचव्या विकेटसाठी शांतनू यादवसह 89 धावांची महत्त्वाची भागीदारी रचली. आर्यवीर 46 व्या षटकांत 173 धावा करून बाद झाला. त्याने या खेळीत 19 चौकार आणि 8 उत्तुंग षटकार ठोकले. आर्यवीरच्या या खेळीच्या जोरावर दिल्लीने 50 षटकांत सहा बाद 289 धावा केल्या.



























































