
‘अस्मिता मराठीची, गौरव कर्तृत्वाचा’ हा कार्यक्रम गिरगाव कट्टाचे सर्वेसर्वा प्रदीप मालणकर यांच्या संकल्पनेतून साकारला आहे. शनिवारी या कार्यक्रमांतर्गत दहा प्रतिभावंतांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. बोरिवली पश्चिम येथील नाटककार जयवंत दळवी लघु नाटय़गृह, चौथा मजला, प्रबोधनकार ठाकरे नाटय़मंदिर येथे दुपारपासून या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
शिवचरित्राचे गाढे अभ्यासक राजू देसाई हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील अपरिचित साम्राज्याचा इतिहास आपल्या धारदार वाणीतून समाजासमोर आणणार आहेत. ओडिसी नृत्यगुरू शुभदा वराडकर, प्रदीप मालणकर, स्वाती मालणकर, मंजिरी शेटे, जान्हवी गुजराथी, प्रणिता कोळथरकर यांच्या हस्ते प्रतिभावंतांचा सन्मान करण्यात येणार आहे. या सोहळय़ात शिवभक्त राजू देसाई, साहित्यिक रवी मल्ल्या, अभिनेते अनिल गवस, क्रिकेट प्रशिक्षक शेखर वराडकर, कवी विजय तारी, जीवन विद्या मिशनच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणाऱया प्रा. नयना रेगे, चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर, शिवसेनेच्या मानवतावादी कार्यावर संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथून पीएचडी मिळविणाऱया प्रा. डॉ. सरिता विजय वाकोडे, ताल तपस्वी श्रीपाद राजगुरू आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नारायण पारदळे यांना यावेळी गौरविण्यात येणार आहे.


























































