
कमी पाऊस आणि ‘एल निनो’च्या प्रभावामुळे पाण्याचे संकट गडद होऊ लागले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईकरांच्या पाणीसमस्येवर उपाय म्हणून महापालिकेने पवई तलावावर लक्ष केंद्रित केले आहे. पवई तलावाचे पाणी पिण्यायोग्य करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.
तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी सल्लागार नियुक्त केला जाणार आहे. तसेच तलाव साफ झाल्यानंतर, त्यातील गाळ काढल्यानंतर आधुनिक जलशुद्धीकरण केंद्र उभारण्याचेही नियोजन आहे. असे झाले तर मुंबईकरांची पाणीटंचाईची समस्या बऱयाच अंशी सुटणार आहे.
ऐतिहासिक पवई तलाव हा पालिकेचा महत्त्वाचा जलस्रोत आहे. सुमारे 210 हेक्टर परिसरात पसरलेल्या या तलावामध्ये अब्जावधी लिटर पाणी साठवण्याची क्षमता आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांत या तलावामध्ये मोठय़ा प्रमाणात गाळ, माती, जलपर्णी आणि सांडपाणी साचल्यामुळे तलावाची मूळ साठवण क्षमता कमालीची घटली आहे. सध्या हे पाणी लोकांना वापरासाठी आणि पिण्यासाठी योग्य नाही. हा तलाव स्वच्छ करण्यासाठी पालिपेने आता पावले टाकली आहेत. यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर येणार आहे.

























































