
अमेरिकन नागरिक असल्याचे भासवून 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदान केल्याप्रकरणी एका हिंदुस्थानी नागरिकाला अटक करण्यात आली आहे. मुकेशकुमार सोमभाई चौधरी असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या निवडणुकीत मिनेसोटामध्ये कमला हॅरिस आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली होती.
चौधरी यांच्याविरोधात दाखल झालेल्या दोषारोपपत्रांनुसार, 5 नोव्हेंबर 2024 रोजी मुकेशकुमार चौधरी याने ‘व्होटर सिग्नेचर सर्टिफिकेट’वर (मतदाराच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र) स्वाक्षरी केली होती. मिनेसोटाच्या कायद्यानुसार, सार्वत्रिक निवडणुकीत मतदान करण्यासाठी हे प्रमाणपत्र आवश्यक असते. या दस्तऐवजावर त्याला आपण अमेरिकन नागरिक असल्याची शपथ घेणे किंवा तशी पुष्टी करणे बंधनकारक होते. मात्र अमेरिकन नागरिक नसतानाही चौधरीने मतदानासाठी खोटा दावा केला, असा आरोप सरकारी वकिलांनी केला आहे.
मुकेशकुमार चौधरी याच्यावर मतदानासाठी खोटी माहिती पुरवणे आणि मतदानासाठी नोंदणी करण्यासाठी नागरिकत्वाचा खोटा दावा करणे या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोप सिद्ध झाल्यास आरोपीला प्रत्येक गुन्ह्यासाठी कमाल 5 वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.




























































