
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी झालेल्या आंदोलनात सहभागी झाल्याने अभिनेता इम्रान खान यांना हिंदुस्थान सोडण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणावरून आता चित्रपट निर्मात्या किरण राव यांनी इम्रान खान यांची पाठराखण केली आहे. ‘वयाची 43 वर्षे झाली असून, त्यापैकी 40 वर्षे हिंदुस्थानातच गेली,’ असे म्हणत त्यांनी इम्रानच्या हिंदुस्थानातील आयुष्याचा उल्लेख केला आहे.
किरण राव यांनी शुक्रवारी इन्स्टाग्राम स्टोरीवर इम्रान यांच्याविषयीची भूमिका मांडली. वयाच्या 43 वर्षापैकी 40 वर्षे त्याने हिंदुस्थानात घालवली. इथेच शिक्षण घेतले, काम केले, यश मिळवले, अपयश अनुभवले, प्रेम केले आणि संघर्षही केला,’ अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या. किरण राव या अभिनेता आमिर खान यांच्या माजी पत्नी असून, इम्रान खान हे आमिर खान यांचे पुतणे आहेत.
10 ऑक्टोबर रोजी मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानावर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात इम्रान खान सहभागी झाले होते. त्यांच्यासोबत त्यांची जोडीदार लेखा वॉशिंग्टन आणि चुलत बहीण झायन मेरी खान यांनाही पोलिसांनी काही काळ ताब्यात घेतले होते. ताब्यात घेण्यापूर्वी इम्रान यांनी आपण एका नागरिकाच्या भूमिकेतून आंदोलनात सहभागी झाल्याचे सांगितले होते. ‘माझ्या कोणत्याही मागण्या नाहीत. या शहरात राहणारी एक व्यक्ती म्हणून मी येथे आलो आहे. लोकांच्या मुक्त संचारावर निर्बंध का आणले जात आहेत आणि त्यांचे आवाज का दाबले जात आहेत, हे जाणून घेण्यासाठी मी येथे आहे,’ असे ते म्हणाले होते.
दरम्यान, या नोटिशीला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याची माहिती इम्रान खान यांच्या वकिलांनी दिली आहे. त्यामुळे या प्रकरणात न्यायालय काय भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे.


























































