चिपळूण पोलिसांची ‘मिशन फिनिक्स’ अंतर्गत मोठी कारवाई, खेर्डीतून सव्वासात लाखांच्या मेफेड्रोनसह संशयित गजाआड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अंमली पदार्थ तस्करांविरोधात पोलिसांनी सुरू केलेल्या ‘मिशन फिनिक्स’ मोहिमेअंतर्गत चिपळूण पोलिसांनी धडक कारवाई करत खेर्डी परिसरातून विक्रीसाठी आणलेला लाखो रुपयांचा मेफेड्रोन हा अंमली पदार्थ जप्त केला आहे. चिपळूण पोलीस ठाण्याचे पथक हद्दीत नियमित गस्त घालत असताना खेर्डी भागात एक इसम संशयास्पदरीत्या फिरताना पोलिसांच्या निदर्शनास आला. पोलिसांनी गुरुवारी रात्री ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी व झडती घेतली असता, त्याच्याकडे विक्रीच्या उद्देशाने बाळगलेला घातक मेफेड्रोन (एमडी) हा अंमली पदार्थ मिळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

या धडक कारवाईत पोलिसांनी संबंधित मेफेड्रोन आणि गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण ७ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपीला ताब्यात घेतले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे व अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेले यांच्या नेतृत्वात चिपळूण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे व त्यांच्या पथकाने ही यशस्वी कामगिरी बजावली असून, तालुक्यातील अंमली पदार्थांचे जाळे मुळासकट उखडून टाकण्यासाठी यापुढील काळातही अशा कारवाया अधिक तीव्र केल्या जातील असा इशारा पोलिसांनी दिला आहे.