
अमित शहा यांनी भाजपमध्ये राजकीय माफियांची भरती केली. त्यांच्या बळावर ते पंतप्रधान व्हायला निघाले आहेत व ज्ञानेश कुमार यांच्यासारखे लोक शहांच्या गाडीचे बैल आहेत. शहांचे मनोरथ पूर्ण होणार नाही. एकतर लोकरेट्यामुळे ज्ञानेश कुमार यांना जावे लागेल व 2029 पर्यंत अमित शहा गृहमंत्रीपदावरून पायउतार झालेले असतील. ज्यांची नजर कमजोर आहे, ज्यांना लाखोंची गर्दी दिसत नाही अशा निराश, वैफल्यग्रस्त माणसाने गृहमंत्रीपदावर राहू नये. देशाचे करायचे तेवढे वाटोळे या माणसाने केले. आता त्यांनी देशावर उपकार करावेत व कायमचे भूमिगत व्हावे. शहा प्रकट झाले म्हणून फार काही घडेल असे नाही!
अखेर देशाचे गृहमंत्री अमित शहा प्रकट झाले व त्यांनी इंडिया आघाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्या हल्ल्यास कोणताही नैतिक आधार नाही. इंडिया ब्लॉक, राहुल गांधी यांचा हल्ला घोटाळेबाज निवडणूक आयुक्त जे अमित शहांचे ‘छोटा शकील’ पद्धतीचे फंटर आहेत त्यांच्यावर आहे. ईव्हीएम घोटाळा, कोट्यवधी मतदारांची नावे वगळणे, निवडणूक आयोगाची सफाई करणे यावर इंडिया आघाडी आंदोलन करत आहे व त्याविरुद्ध दिल्ली दणाणून सोडली आहे. सोमवारी लाखोंचा मोर्चा ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात निघाला. त्यावर बोलायचे सोडून गृहमंत्री शहा यांनी जाहीर केले की, सोमवारच्या विराट मोर्चात फक्त आठ हजार लोक होते व हे आठ हजार लोक देशाचा आवाज बनू शकत नाहीत. 2029 सालीही काँग्रेसने पराभवासाठी तयार राहावे, अशी वायफळ बडबड गृहमंत्रीपदावरील व्यक्तीने करावी हे दुर्दैव आहे. अमित शहा हे बऱ्याच काळानंतर प्रकट झाले. इतके दिवस ते ‘अंडरग्राऊंड’ होते. ते असे कोणते चिंतन करत होते की, देश पेटला असताना त्यांना समाधी अवस्थेत जावे लागले. शहा यांच्या प्रकृतीविषयी अनेक खात्रीशीर बातम्या येत असतात. त्यांची प्रकृती बऱ्याच कारणाने बरी नसते व सध्याचा तणाव त्यांचा मेंदू व शरीर झेलू शकत नाही ते सर्व खोटे ठरो, पण त्यांची नजर आणि कानाचे पडदे कमजोर पडले आहेत. तसे नसते तर लाखोंच्या मोर्चाला त्यांनी आठ हजारांचा मोर्चा असे हेटाळले नसते. जागतिक माध्यमांनी या मोर्चाचे छायाचित्रण केले व प्रसारित करून प्रचंड मोर्चा असे म्हटले आहे, पण गृहमंत्री भूमिगत असल्याने ज्ञानेश कुमार, सीमा खन्ना यांच्यासारख्या
आकडेतज्ञांनी दिलेल्या
आकडय़ावरच ते विसंबून आहेत. शहा म्हणतात, ‘‘दीड किलोमीटरच्या क्षेत्रात आठ हजार लोक हा काय जनतेचा मोर्चा झाला?’’ अमित शहा मग फक्त आठ हजारांच्या मोर्चासाठी दीड किलोमीटर क्षेत्रात अडीच लाख सशस्त्र पोलीस आपण का उतरवले होते? दिल्लीतले शंभरेक ‘हवालदार’देखील पुरले असते. शहा हे कृष्ण मेनन रोडवर राहतात व त्यांच्या निवासस्थानाच्या चारही बाजूला पाच किलोमीटर क्षेत्र जनतेसाठी बंद केले आहे. मग ही भीती कशासाठी? लाखोंची गर्दी ज्यांना आठ हजारांची दिसते, त्यांनी डोळ्याचा नंबर नव्याने काढायला हवा. चष्मा बदलायला हवा. कानाचे पडदे साफ करून जनतेचा आक्रोश, गर्जना ऐकायला हव्यात. शहा यांची नजर विकलांग झाली आहे व त्यांचे मनही थाऱ्यावर नाही. गृहमंत्री म्हणून त्यांनी भारतात केलेल्या गुंडशाहीविरोधात जनता बेडरपणे रस्त्यावर उतरली आहे. फक्त आठ हजारांच्या मोर्चाला घाबरून अमित शहा व त्यांच्या दिल्ली पोलिसांनी यापुढे ‘जंतर मंतर’वर आंदोलनास बंदी घातली आहे आणि ‘जंतर मंतर’वरील बंदीविरोधात आवाज उठवणाऱ्या तरुण पोरांना कोठडीत डांबले आहे. सरकार तरुणांना घाबरू लागते तेव्हा त्यांचे पाय लटपटत आहेत हे सिद्ध होते. शहा यांनी आव्हान दिले की, राहुल गांधी 2029च्या पराभवासाठी तयार राहावे. शहांच्या तोंडून ज्ञानेश कुमारच गर्जना करत आहेत असेच वाटले. 13 कोटी मतदारांची नावे ज्ञानेश कुमार यांनी
‘एसआयआर’च्या नावाखाली
वगळली आहेत ती भाजपच्या झुंडगिरीस व शहांच्या गुंडगिरीस विजयी करण्यासाठी. ‘ईव्हीएम’मध्ये सात टक्के मते कमळाबाईच्या बाजूने ‘सेट’ केली जातात व त्यामुळे भाजप विजयी होत आली. ज्ञानेश कुमार, राजीव कुमार, सीमा खन्ना यांच्यासारख्या देशद्रोह्यांनी लोकशाहीचा गळा घोटला आहे व गृहमंत्री शहा या देशाच्या शत्रूंच्या मदतीने विरोधी पक्षाला आव्हान देत आहेत. शहा यांनी आपल्या पिचक्या मांडीवर थाप मारून आव्हान देणे म्हणजे भारतीय संविधानास न जुमानण्यासारखे आहे. शहा यांना पंतप्रधान होण्याची घाई झाली आहे व 2029च्या आधीच त्यांना मोदींच्या खुर्चीवर बसायचे आहे. त्यानंतर भाजपचा खेळ संपणार आहे, पण शहा यांना भाजपमध्येच विरोध आहे व ज्येष्ठ मंत्र्यांनी शहांच्या विरोधात बंड केले आहे. निदान उपपंतप्रधान तरी करा ही त्यांची विनवणी आहे. अमित शहा यांनी भाजपमध्ये राजकीय माफियांची भरती केली. त्यांच्या बळावर ते पंतप्रधान व्हायला निघाले आहेत व ज्ञानेश कुमार यांच्यासारखे लोक शहांच्या गाडीचे बैल आहेत. शहांचे मनोरथ पूर्ण होणार नाही. एकतर लोकरेट्यामुळे ज्ञानेश कुमार यांना जावे लागेल व 2029 पर्यंत अमित शहा गृहमंत्रीपदावरून पायउतार झालेले असतील. ज्यांची नजर कमजोर आहे, ज्यांना लाखोंची गर्दी दिसत नाही अशा निराश, वैफल्यग्रस्त माणसाने गृहमंत्रीपदावर राहू नये. देशाचे करायचे तेवढे वाटोळे या माणसाने केले. आता त्यांनी देशावर उपकार करावे व कायमचे भूमिगत व्हावे. शहा प्रकट झाले म्हणून फार काही घडेल असे नाही!






























































