लेख – जागतिक अस्थिरता आणि भारतीय शेअर बाजार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> जितेन्द्र श्रीराम

सध्याचे बाजारातील वातावरण अल्पकालीन अनिश्चितता आणि दीर्घकालीन संरचनात्मक संधी यांच्यात स्पष्ट फरक अधोरेखित करण्यावर भर देताना दिसते.  बाजाराच्या या टप्प्यात गुंतवणूकदारांचे लक्ष केवळ किमतीतील वेगवान वाढीपेक्षा अशा कंपन्या आणि क्षेत्र ओळखण्यावर असले पाहिजे, जिथे कमाईची स्पष्टता अधिक सक्षम राहिलेली आहे.

भारतीय शेअर बाजार सध्या  जागतिक पातळीवर निर्माण झालेल्या अनेक अनिश्चित घटकांचा सामना करत आहे. विविध देशांत सुरू असलेल्या राजकीय-भौगोलिक संघर्षामुळे निर्माण झालेले धोके, खनिज तेलाचे वाढलेले भाव, चलनातील चढउतार आणि कंपन्यांची कमाईतील आगामी वाढ कशी राहील, याबाबत निर्माण झालेल्या प्रश्नांना बाजाराला तोंड द्यावे लागत आहे. यातील काही घटक बाजाराच्या मूल्यांकनात आधीच गृहीत धरले गेले असले तरी मला वाटते की, असे काही धोके आहेत आणि त्यांचा गुंतवणूकदारांनी अद्याप पूर्णपणे विचार केलेला नाही.

माझ्या मते, ज्या प्रमुख धोक्याचा अद्याप पूर्णपणे विचार केला गेलेला नाही, तो धोका म्हणजे पश्चिम आशियात सातत्याने बदलत असलेली परिस्थिती. जर खनिज तेलाचे भाव दीर्घकाळ वाढलेले राहिले तर त्याचे परिणाम केवळ वाढलेल्या इंधन खर्चापुरते मर्यादित न राहता अन्य क्षेत्रांवरही होऊ शकतात. तेलाची ही सातत्यपूर्ण भाववाढ जगाला मंदीकडे नेऊ शकते. त्याचबरोबर महागाईतही वाढ घडवून आणू शकतात. वाढलेली महागाई आणि कमकुवत आर्थिक वाढ या दोन्हीचे हे मिश्रण अशी सध्याची परिस्थिती आहे आणि शेअर बाजार सध्या याचा कदाचित पूर्णपणे अंदाज घेत नाही.

भारतावर होणारा परिणाम

भारतासाठी कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमतींच्या परिणामांची अतिशय गांभीर्याने दखल घेणे खूपच महत्त्वाचे ठरते. कारण आपला देश इंधनाच्या आयातीवर मोठय़ा प्रमाणावर अवलंबून आहे. तेलाचा हा दीर्घकाळ बसणारा झटका अनेक घटकांवर परिणाम करतो आणि ते म्हणजे महागाई, चलन (रुपयाची किंमत) आणि कंपन्यांच्या उत्पादन खर्चावर दबाव टाकू शकतो. तसेच सर्वसामान्यांच्या खरेदी शक्तीवरही परिणाम करू शकतो. भारत जरी ऊर्जा सुरक्षेच्या दिशेने आणि देशांतर्गत तसेच अपारंपरिक (अक्षय) ऊर्जा स्रोतांना बळकट करण्याच्या मार्गावर वेगाने वाटचाल करत असला तरी असे बदल एका रात्रीत घडून येऊ शकत नाहीत. या संक्रमण काळात काही प्रमाणात आर्थिक अडचणी, वेदना सहन कराव्या लागू शकतात.

सप्टेंबरमध्ये घोषित केलेल्या जीएसटी कपातीमुळे आर्थिक वर्ष 2026 च्या तिसऱया आणि चौथ्या तिमाहीत मागणीत मोठी वाढ झाली. विशेषतः इलेक्ट्रॉनिक्स आणि घरगुती उपकरणांच्या वस्तू आणि दुचाकी व चारचाकी वाहनांच्या मागणीत वाढ दिसून आली. यामुळे चालू वर्षातील याच कालावधीसाठी तुलनेने उच्च पाया तयार होतो आणि त्यामुळे आर्थिक वर्ष 2027 च्या उत्तरार्धात (दुसऱया सहामाहीत) गतवर्षाच्या तुलनेत वाढ अधिक मर्यादित किंवा कमी स्वरूपाची दिसण्याची शक्यता आहे.

भारतीय समभाग बाजाराला आधार देणाऱया महत्त्वाच्या घटकांपैकी एक म्हणजे देशांतर्गत संस्थात्मक प्रवाहांमध्ये दिसत असलेली मजबुती. मोठय़ा  प्रमाणावर लाभांश किंवा भांडवल असलेल्या ‘लार्ज-कॅप’ कंपन्यांचे शेअर्सच्या मालकीमध्ये परदेशी गुंतवणूकदारांच्या पारंपरिकरीत्या मोठा वाटा राहिला आहे. गेल्या 18 ते 20 महिन्यांत या शेअर्समधील परदेशी गुंतवणूक बाहेर पडल्यामुळे लार्ज-कॅप शेअर्स हे व्यापक बाजाराच्या तुलनेत पिछाडीवर पडले आहेत.

चलनावरील परिणाम

जागतिक गुंतवणूकदारांसाठी चलन हा आणखी एक महत्त्वाचा घटक असतो. एक आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार शेवटी एका सामान्य चलनानुसार सामान्यतः अमेरिकन डॉलर किंवा युरोवर आधारित विविध बाजारांमधील परताव्याची तुलना करतो. परिणामी, घसरत जाणारा रुपया परताव्यासाठी एक अडथळा बनतो, तर चलनाची स्थिरता किंवा मजबुती त्याला आधार देऊ शकते. रुपयाबाबतची नकारात्मक भावना काही प्रमाणात कमी करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने अलीकडे आणलेल्या अनिवासी भारतीयांसाठीची परकीय चलनातील मुदत ठेव (FCNR(B) योजनेचे यश मदत करू शकते.

सध्याच्या वातावरणात मला वाटते की, गुंतवणूकदारांनी केवळ किमतीतील वेगवान वाढीवर (मोमेंटम) लक्ष केंद्रित करण्याऐवजी, कमाईच्या स्थिरतेवर आणि स्पष्टतेवर अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे. फार्मास्युटिकल आणि हेल्थकेअर हे क्षेत्र तुलनेने मंदीरोधक  आहेत, कारण आरोग्य सेवा आणि उत्पादनांची मागणी ही मंदीतही कमी होत नसते जागतिक अनिश्चिततेच्या काळात, हे वैशिष्टय़ आपोआपच गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेते. परंतु फार्मा क्षेत्रावरील आमची पसंती ही केवळ त्याच्या बचावात्मक गुणधर्मांवरच आधारित नाही.

करारानुसार संशोधन व उत्पादन करणाऱया संस्था (CDMOs), बायोसिमिलर (जैव-समक औषधे) आणि पेप्टाइड्स या क्षेत्रात भविष्यात मोठी दीर्घकालीन संधी दिसत आहे. हे केवळ काही बाजारातील चढउतारानुसार चालणारे (सायक्लिकल) घटक नाहीत; तर ते जागतिक औषध निर्माण जगतातील संरचनात्मक बदल दर्शवतात. या कारणांमुळे, सध्या फार्मा क्षेत्रातील गुंतवणूक प्रमाणापेक्षा जास्त ठेवण्याच्या बाजूने आमचा कल आहे. आरोग्य सेवा, युटिलिटिज (वीज, पाणी इत्यादी पायाभूत सुविधा) आणि दूरसंचार या इतर विभागातही आणखी वाढ दिसून येऊ शकते. कारण ही क्षेत्रे मोठय़ा प्रमाणावर देशांतर्गत मागणीनुसार वाटचाल करत असतात.

आयटी सेवांचे चित्र अधिक गुंतागुंतीचे आणि संमिश्र आहे. साधारणपणे, रुपयाच्या घसरणीसह अस्थिर बाह्य वातावरण भारतीय आयटी निर्यातदारांसाठी फायदेशीर ठरू शकते. तथापि, तंत्रज्ञान सेवा उद्योगावर कृत्रिम बुद्धिमत्तेचा संभाव्य प्रभाव हा एक महत्त्वाचा अडथळा ठरू शकतो किंवा तोल सांभाळणारा घटक (काऊंटरवेट) म्हणून  तो कायमसुद्धा आहे.

गुंतवणूकदारांनी अतिशय बारीक लक्ष देण्याची गरज असलेला आणखी एक घटक म्हणजे अमेरिकी रोख्यांवरील परताव्याचा आगामी काळातील कल हा आहे. फेडरल रिझर्व्ह (अमेरिकेची मध्यवर्ती बँक) द्वारे ठरवले जाणारे धोरणात्मक व्याजदर आणि रोखे परताव्यांत प्रतिबिंबित होणारे बाजाराद्वारे गृहीत धरलेले व्याजदर यांच्यात एक महत्त्वाचा फरक आहे आणि तो म्हणजे विशेषतः जेव्हा महागाईमध्ये तात्पुरती वाढ होते, तेव्हा या दोन्हीमधील रस्सीखेच सुरूच राहण्याची शक्यता असते.

सध्याचे बाजारातील वातावरण अल्पकालीन अनिश्चितता आणि दीर्घकालीन संरचनात्मक संधी यांच्यात स्पष्ट फरक अधोरेखित करण्यावर भर देताना दिसते.  बाजाराच्या या टप्प्यात गुंतवणूकदारांचे लक्ष केवळ किमतीतील वेगवान वाढीपेक्षा अशा कंपन्या आणि क्षेत्र ओळखण्यावर असले पाहिजे, जिथे कमाईची स्पष्टता अधिक सक्षम राहिलेली आहे.