
आंतरराष्ट्रीय सीमेवरून ड्रोनद्वारे होणारी अंमली पदार्थांची तस्करी रोखण्याच्या कर्तव्यावर असलेला पंजाब पोलिसातील कॉन्स्टेबलच तस्कर निघाला. तरनतारन जिल्ह्यात 15 किलो हेरॉईनसह कॉन्स्टेबलला अटक करण्यात आली आहे. जप्त केलेल्या हेरॉईनची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत 40 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. करणदीप सिंग असे अटक केलेल्या कॉन्स्टेबलचे नाव आहे.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, सीमा सुरक्षा दल (BSF) आणि तपास यंत्रणांनी सीमावर्ती जिल्ह्यातील सराई अमानत खान भागात केलेल्या कारवाईदरम्यान करणदीप सिंगला ताब्यात घेतले. आरोपी अंमली पदार्थांचा हा साठा सीमेवरून आपल्या भुस्से या गावी घेऊन जात होता, असे समजते. तपास अधिकारी या कथित तस्करी प्रकरणी सखोल तपास करत आहेत.

























































