
कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी १६ ऑक्टोबर रोजी दिल्लीतील कॅनॉट प्लेस येथील सेंट्रल पार्कमध्ये ‘लहरा दो तिरंगा’ या मोहिमेअंतर्गत मोठ्या संख्येने जमून राष्ट्रध्वज फडकवण्याची घोषणा केली आहे. सीजेपी नेते सौरव दास आणि आशुतोष रांका यांना जंतरमंतरवर तिरंगा फडकवल्याप्रकरणी आणि विनापरवानगी प्रवेश केल्याच्या आरोपावरून ५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर ही घोषणा करण्यात आली आहे.
सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्या अटकेचा निषेध म्हणून आणि संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकाराचा वापर करत, अभिजीत दीपके यांनी देशभरातील तरुणांना आणि नागरिकांना या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी सांगितले की, “जंतरमंतरवर जाऊन तिरंगा फडकवणे हा जर गुन्हा ठरत असेल, तर आम्ही १६ ऑक्टोबरला कॅनॉट प्लेसच्या सेंट्रल पार्कमध्ये एकत्र येऊ आणि तिथेही तिरंगा फडकवू. आम्ही पाहू इच्छितो की सरकार आम्हाला तिथेही राष्ट्रध्वज फडकवण्यापासून कसे रोखते.”
त्यांनी या कारवाईवर तीव्र संताप व्यक्त करत म्हटले आहे की, “शांततापूर्ण मार्गाने देशाचा राष्ट्रध्वज फडकवणे हा कोणताही गुन्हा नाही. तरुणांचा आवाज दाबण्याचा आणि त्यांना घाबरवण्याचा सरकारचा हा प्रयत्न आम्ही यशस्वी होऊ देणार नाही.”
Lehra do Tiranga 🇮🇳
16 Oct | Central Park, CP | 5 PM https://t.co/eFO1RfUBos
— Abhijeet Dipke (@abhijeet_dipke) October 14, 2026





























































