
हिंदुस्थानचा माजी फलंदाज शिखर धवन याने ‘वर्ल्ड टी20 कॉन्टिनेंटल कप’च्या आयोजकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. आयोजकांनी कोणतीही पूर्वकल्पना किंवा परवानगी न घेता स्पर्धेत सहभागी म्हणून आपले नाव जाहीर केल्याचा गंभीर आरोप धवनने केला आहे. तसेच, या खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्यांवर चाहत्यांनी व प्रसारमाध्यमांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्याने केले आहे.
शिखर धवनने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत लिहिले की, ‘वर्ल्ड टी20 कॉन्टिनेंट कपमध्ये सहभागी म्हणून माझे नाव असल्याचे माझ्या निदर्शनास आले आहे. आयोजकांनी माझ्या माहितीशिवाय आणि परवानगीशिवाय माझे नाव वापरले आहे आणि यावर तोडगा काढण्यासाठी माझी टीम योग्य कायदेशीर पाऊल उचलेल. मी प्रसारमाध्यमे आणि माझ्या चाहत्यांना विनंती करतो की, कोणत्याही खोट्या घोषणांवर विश्वास ठेवू नये किंवा त्याबद्दल वृत्त देऊ नये. तुमच्या अविरत प्रेमाबद्दल आणि पाठिंब्याबद्दल धन्यवाद’, असे म्हटले आहे.
I have come across my name as a participant in the World T20 Continent Cup. My name has been used by the organisers without my knowledge or permission, and my team will be taking the appropriate legal steps to address this.
I request the media and my fans to not report or rely on any unauthorised announcements. Thank you for your continued love and support. 🙏
— Shikhar Dhawan (@SDhawan25) October 13, 2026
विशेष म्हणजे, या 24 सदस्यीय आशिया वॉरियर्स संघात शिखर धवन हा एकमेव हिंदुस्थानी खेळाडू नाही. त्याच्यासह हिंदुस्थानचे माजी क्रिकेटपटू राहुल शर्मा, गुरकीरत सिंग मान आणि अभिमन्यू मिथुन यांचाही या संघात समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या संघात सोहेल तनवीर, इफ्तिखार अहमद आणि मोहम्मद इम्रान खान यांच्यासह अनेक पाकिस्तानी खेळाडूंचाही समावेश आहे.
गेल्या काही वर्षांत हिंदुस्थान-पाकिस्तान संबंध आणि दहशतवादाच्या मुद्द्यांवर शिखर धवनने नेहमीच अत्यंत आक्रमक आणि देशभक्तीपर भूमिका घेतली आहे. त्यामुळे पाकिस्तानी खेळाडूंचा समावेश असलेल्या संघात त्याचे नाव आल्याने क्रिकेट वर्तुळात मोठी चर्चा रंगली होती. अखेर या प्रकरणी स्वतः धवनने पुढे येत आपली बाजू स्पष्ट केली असून आयोजकांच्या या कृत्याविरोधात कायदेशीर पावले उचलणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
































































